कोहलीला कर्णधारपदावरुन हटवू नका, चांगला प्रशिक्षक द्या : अख्तर
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरुन विराट कोहली (Virat Kohli) ला हटवणं मूर्खपणाचं आहे, असं मत ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ अशी ख्याती असलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) व्यक्त केलं आहे. कोहलीला चांगले प्रशिक्षक आणि निवड समिती मिळण्याची आवश्यकता आहे, असं सांगायलाही तो विसरला नाही. विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीतून भारत बाद झाल्यानंतर कोहलीच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित […]
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरुन विराट कोहली (Virat Kohli) ला हटवणं मूर्खपणाचं आहे, असं मत ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ अशी ख्याती असलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) व्यक्त केलं आहे. कोहलीला चांगले प्रशिक्षक आणि निवड समिती मिळण्याची आवश्यकता आहे, असं सांगायलाही तो विसरला नाही.
विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीतून भारत बाद झाल्यानंतर कोहलीच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. कसोटी क्रिकेट संघाचं नेतृत्व कोहलीकडे कायम ठेवावं, मात्र एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात यावी, असा सूर उमटत होता. त्यातच टीम इंडियामध्ये विराट आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे दोन गट पडल्याचीही चर्चा होती. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वीच कोहलीने हे सर्व आरोप नाकारले असले, तरी कुजबूज कायम होती. त्यातच शोएब अख्तरने कोहलीची बाजू उचलून धरली आहे.
रोहित उत्तमच, पण विराटवर खूप मेहनत
‘कोहलीची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करु नये, असं मला वाटतं. महत्त्वाचं कारण म्हणजे त्याच्यावर प्रचंड मेहनत घेतली गेली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून तो नेतृत्व करत आहे’ असं शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
‘विराटला बरा प्रशिक्षक आणि चांगली निवड समिती मिळाली, तर त्याच्यामध्ये सुधारणा दिसेल. बीसीसीआयकडून आवश्यक तो सपोर्ट स्टाफ मिळाला, की तो उत्तम पर्याय ठरेल. रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व उत्तम प्रकारे केलं आहे, यात वादच नाही. मात्र कोहलीच्या कर्णधारपदावर खूप मेहनत घेतली गेली आहे. त्यामुळे त्याला हटवणं मूर्खपणाचं ठरेल.’ असं अख्तर म्हणतो.
बीसीसीआने चुका लक्षात आणाव्यात
बीसीसीयने विराट कोहलीसोबत बातचित करावी. त्याने कधी, विशेषतः विश्वचषकातील फलंदाजीदरम्यान काय चुका केल्या आहेत, हे निदर्शनास आणून द्यावं. त्याला सुधारणेसाठी थोडा वाव द्यावा, म्हणजे तो संघाला चांगल्या प्रकारे हाताळेल, असं शोएब अख्तरला वाटतं.
विराट-रोहितमध्ये सारं आलबेल
टीम इंडियामध्ये कर्णधार विराट कोहली आणि त्याचे समर्थक तसेच उपकर्णधार रोहित शर्मा आणि त्याचे पाठीराखे असे दोन गट पडल्याचीही चर्चा होती. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचा दावा अख्तरने केला. दोघांमध्ये मतभेद असले, तरी ते विश्वचषकापूर्वीच संपले असतील, असंही मत शोएबने व्यक्त केलं.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदासाठी BCCI कडे दोन हजारपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी, न्यूझीलंडचे माजी आणि सध्या आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रमुख कोच माईक हेसन, भारतीय क्रिकेट संघाचे माजी सदस्य रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत यांनीही संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज पाठवला आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू ज्याँटी रोड्सने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे.
रवी शास्त्रींना मुदतवाढ
भारतीय संघाच्या सध्याच्या प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. संघाच्या प्रशिक्षकपदाचा करार हा विश्वचषकापर्यंतचा होता. मात्र, प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ 45 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. आता वेस्ट इंडिज दौरा संपेपर्यंत रवी शास्त्री हे संघाचे प्रशिक्षक राहाणार आहेत.
तीन ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेल. यादरम्यान, तीन 20-20 आंतरराष्ट्रीय, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.