परत येण्यासाठी डिव्हिलियर्सने फोन केला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती : प्लेसिस
याबाबत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फफ डू प्लेसिसनेही यावर पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पावसामुळे पाण्यात गेल्यानंतर प्लेसिस माध्यमांशी बातचीत करत होता.
लंडन : विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची अवस्था दुबळ्या संघांपेक्षाही वाईट झाली आहे. भारताविरुद्ध सहा विकेट्स पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने संघात परत येण्याची इच्छा व्यक्त केली. पण संघ व्यवस्थापनाने ही मागणी फेटाळली. याबाबत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फफ डू प्लेसिसनेही यावर पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पावसामुळे पाण्यात गेल्यानंतर प्लेसिस माध्यमांशी बातचीत करत होता.
“एबीसोबत माझी भेट झाली नव्हती. आमचं फोनवर बोलणं झालं होतं. संघाची निवड होण्यापूर्वी त्याने मला फोन केला होता. मला पुन्हा यावं वाटतंय, असं त्याने सांगितलं होतं. पण मी त्याला सांगितलं की आता वेळ निघून गेली आहे, तरी दुसऱ्या दिवशी संघ व्यवस्थापनाशी चर्चा करुन निर्णय कळवतो. कारण, संघ जवळपास ठरलेला होता. प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांशी बातचीत केली तेव्हा त्यांचंही हेच म्हणणं होतं, की संघात बदल आता शक्य नाही,” असं प्लेसिसने सांगितलं.
डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण त्याची पुन्हा एकदा संघात येण्याची इच्छा होती. यासाठी त्याने संघ व्यवस्थापनाशीही बातचीत केली, पण व्यवस्थापनाकडून त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. गेल्या महिन्यात विश्वचषकासाठी संघ निवडण्याच्या एक दिवस अगोदर डिव्हिलियर्सने ही मागणी ठेवली होती.
दरम्यान, बोर्डातील सूत्रांच्या मते, एबीली निवृत्ती न घेण्याची विनंती करण्यात आली होती. पण त्याने टी-20 मालिकांमध्ये खेळण्याचा प्राधान्य देत निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे या सगळ्यानंतरही त्याचा संघात समावेश करणं हे नियमांच्या विरुद्ध ठरलं असतं.
या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची अवस्था अत्यंत वाईट आहे. पहिल्या तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. इंग्लंड, बांगलादेश आणि भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला. तर वेस्ट इंडिजसोबतचा सामना पावसामुळे वाया गेला. डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेकडून 2004 ते 2018 या काळात 288 वन डे सामन्यात 9577 धावा केल्या.