मुंबई- आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानवर 7 गडी आणि एक षटक राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं 20 षटकात 4 गडी गमवून 149 धावांची खेळी केली आणि विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं हे आव्हान 3 गडी गमवून 19 व्या षटकात पूर्ण केलं. या विजयात जेमिमा रॉड्रिग्सनं मोलाची भूमिका बजावली.मधल्या षटकात हे आव्हान अवघड वाटत असताना जेमिमाने आक्रमकपणे बाजू सावरली. जेमिमानं 38 चेंडूत 53 धावांची खेळी केली. जेमिमाच्या आक्रमक खेळीपुढे पाकिस्तानी गोलंदाज पुरते हतबल झाले होते. जेमिमाने शेवटी धोनी स्टाईल चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. तसेच शेवटच्या चेंडूवर चौकार मारत आपली अर्धशतकी खेळीही पूर्ण केली.
जेमिमा आणि रिचा घोष यांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. जेमिमा रॉड्रिक्सनं 53, तर रिचा घोषनं 31 धावांची खेळी केली. 19 षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेमिमाला फातिमा सानानं आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. जेमिमानं या चेंडूचा पुरेपूर फायदा घेत शॉर्ट थर्डवरून चौकार मारला. त्यानंतर सानाच्या पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार ठोकत संघाला धोनी स्टाईल विजय मिळवून दिला.जेमिमाच्या या खेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
JEMIMAHHHHHHHHHH pic.twitter.com/HJQfMaRSmy
— cricket_funsssss (@cricket_funs) February 12, 2023
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजयाची शिल्पकार ठरल्याने जेमिमा रॉड्रिग्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. जेमिमाने सांगितलं की, “काय बोलावं मला सूचत नाही.त्याक्षणी फक्त इतकंच कळत होतं की, विजयासाठी भागीदारी महत्त्वाची आहे. रिचा आणि मी तेच केलं. ही खेळी आम्हा दोघांसाठी महत्त्वाची आहे. ही खेळी मी माझ्या आई वडिलांना समर्पित करते. ते दोघे हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होते.”
यास्तिका भाटिया आणि शफाली वर्मानं भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 38 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यास्तिका सादिया इक्बालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 4 चौकारांच्या जोरावर 17 चेंडूत 17 धावा केल्या. त्यानंतर शेफाली वर्मानं तंबूत परतली. तिने 4 चौकाराच्या जोरावर 25 चेंडूत 33 केल्या. मात्र एका चुकीच्या फटक्यामुळे नाश्रा सांधूच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौर संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा आणि रिचा घोषनं संघाला विजयाकडे नेलं. जेमिमानं 38 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. तर रिचानं 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.
पाकिस्तानः बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयमान अन्वर, आयशा नसीम, फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, सदफ शम्स, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.