स्पिन बॉलिंग खेळण्यास कोहली आणि पुजारा अकार्यक्षम ? गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं
बॉर्डर गावसकर मालिकेत खेळपट्ट्यांचा वाद खूपच रंगला आहे. खेळपट्ट्या स्पिनर्ससाठी पूरक असल्याने फलंदाजी करणं कठीण झालं आहे. त्यात कसोटी तिसऱ्याच दिवशीच संपत असल्याने टीका होत आहे.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना गमवल्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारासह इतर फलंदाजांवर टीकेची झोड उठली आहे. स्पिन बॉलिंग खेळण्यात अकार्यक्षम असल्याची टीकाही करण्यात येत आहे. काही जण इंदुरमध्ये स्पिनिंग खेळपट्टी तयार करणं चांगलंच महागात पडल्याचं बोलत आहेत. असं असताना गौतम गंभीरने याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची पाठराखण करत म्हणाला, “जर कोहली आणि पुजारा चांगल्या पद्धतीने स्पिन खेळत नसते, तर त्यांनी 100 कसोटी सामने खेळले नसते.” चौथ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी कशी असेल याकडे जाणकारांचे डोळे लागून आहेत.
“चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रोहित शर्मा स्पिन बॉलिंग चांगल्या प्रकारे खेळतात. स्पिनला योग्य प्रकारे सामोरे नसते गेले तर आज कोहली आणि पुजारा 100 कसोटी सामने खेळले नसते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी स्पिन आणि वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागतो. हा पण एक गोष्ट नक्कीच बदलली आहे ती म्हणजे डीआरएस..डीआरएस महत्त्वाची भूमिका बजावते.”, असं गौतम गंभीरनं सांगितलं.
“जेव्हा फ्रंट फुटवर डीआरएस आणि एलबीडब्ल्यू नव्हतं. तेव्हा तुम्हाला अनेकदा टेक्निक बदलावी लागायची. पण लोकं याबाबत जास्त काही बोलत नाहीत.”, असंही गौतम गंभीरनं पुढे सांगितलं. तसेच कसोटी सामने तिसऱ्या दिवशीच संपत असल्याने त्याने चिंता व्यक्त केली.
“मला वाटतं टर्निंग ट्रॅकवर खेळणं ठिक आहे. पण अडीच दिवसात कसोटी सामना संपणं, याचं मी समर्थन नाही करणार. टाइट फिनिशिंग झाली पाहीजे, जसं आपण न्यूझीलँड आणि इंग्लंड कसोटी दरम्यान पाहिल.कसोटी सामना चौथ्या किंवा पाचव्या दिवसापर्यंत जात असेल तर ठिक आहे. पण अडीच दिवस म्हणजे खूपच कमी आहे.”, असंही गौतम गंभीरने पुढे सांगितलं.
बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. भारताने या मालिकेत 2-1 आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारताला चौथा सामना जिंकणं गरजेचं आहे. अन्यथा श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड मालिकेवर अवलंबून राहावं लागेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट