मुंबई: महाराष्ट्र फुटबॉल कपची चर्चा आता शाळांमध्ये जोरदारपणे रंगू लागली आहे. 14 वर्षांखालील खेळाडू आपली मेहनत मैदानात दाखवताना दिसत आहे.प्रत्येक खेळाडू एफसी बायर्न क्लबसोबत खेळण्यासाठी जीवाचं रान करत आहे. टॉप 20 खेळाडूंमध्ये आपली निवड व्हावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यात पार पडत आहे. आता मुंबई शहरातून एका संघाची निवड झाली आहे. 30 मिनिटांच्या स्पर्धेत सेंट पॉल या शाळेनं बाजी मारली. अंतिम फेरीत सेंट मेरी या शाळेचा 1-0 ने धुव्वा उडवला. अंतिम क्षणी सेंट पॉलच्या आयर्न विजयी गोल झळकावला आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे सेंट पॉल या शाळेची आगेकूच सुरु झाली आहे. आता विभागवार टप्प्यात आणखी मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे.
सेंट पॉल विरुद्ध कॅम्पियन उपांत्य फेरीचा सामना
सेंट पॉल आणि कॅम्पियन या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगला होता. हा सामना सेंट पॉल संघाने 2-0 ने जिंकला. या विजयानंतर सेंट पॉल संघाने अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांचा उत्साह वाखाण्याजोगा होता.
बॉम्बे स्कॉटिश विरुद्ध सेंट मेरी आयसीएसई उपांत्य फेरीचा सामना
बॉम्बे स्कॉटिश विरुद्ध सेंट मेरी आयसीएसई या दोन संघात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगला होता. पण हा सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटऑऊटमध्ये निकालासाठी कौल घ्यावा लागला. खरं तर या मॅचमध्ये बॉम्बे स्कॉटिशकडे 90 टक्के फुटबॉलचा ताबा होता. पण सेंट मेरीनं जबरदस्त डिफेंड करत सर्व हल्ले परतवून लावले. हा सामना 0-0 ने बरोबरीत सुटला. पेनल्टी शूटआउटमध्ये सेंट मेरीनं 4-2 ने बाजी मारली. यात गोलकीपरची भूमिका निर्णायक राहिली. त्यानंतर अंतिम फेरीत सेंट पॉल विरुद्ध सेंट मेरी असा सामना रंगला. हा सामना सेंट पॉल या संघानं जिंकला.
आता पहिल्या टप्प्यातील सामने पार पडल्यानंतर विभागवार स्पर्धा होतील आणि शेवटी पुण्यात अंतिम टप्प्यातील संघ भिडणार आहेत. या स्पर्धेवर एफसी बायर्न मुनिच क्लबची बारीक नजर आहे. या स्पर्धेतील 20 टॉप खेळाडूंची निवड करून जर्मनीत क्लबमार्फत ट्रेनिंग दिलं जाणार आहे. म्हणजेच क्रिकेटच्या मातीत भविष्यात उत्तम फुटबॉलपटू यात शंकाच नाही.