जालन्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार, गतविजेता अभिजित कटकेच्या लढतीकडे लक्ष
जालना : 62 व्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या तिसर्या दिवशीचं सकाळचं सत्र गादी आणि माती विभागातील 61,70 व 86 किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि 74 आणि 97 वजनगटांसह ‘महाराष्ट्र केसरी’च्या खुल्या गटांच्या वजनांनी पार पडलं. 61 किलो माती विभागात सेमीफायनलमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमने साताऱ्याच्या सागर सूळचा 7-0 अशा गुणफरकाने पराभव करून अंतिमफेरीत गाठली. तत्पूर्वी निखिलने उपांत्यपूर्व […]
जालना : 62 व्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या तिसर्या दिवशीचं सकाळचं सत्र गादी आणि माती विभागातील 61,70 व 86 किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि 74 आणि 97 वजनगटांसह ‘महाराष्ट्र केसरी’च्या खुल्या गटांच्या वजनांनी पार पडलं. 61 किलो माती विभागात सेमीफायनलमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमने साताऱ्याच्या सागर सूळचा 7-0 अशा गुणफरकाने पराभव करून अंतिमफेरीत गाठली.
तत्पूर्वी निखिलने उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेला 4-2 असे नमवून सेमीफायनल गाठली होती. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सांगलीच्या राहुल पाटील आणि उस्मानाबादच्या दत्ता मेटे यांच्यात झालेल्या अत्यंत अटीअटीची लढतीत राहुल पाटीलने दत्ता मेटेवर 12-11 असा निसटसा पराभव करून अंतिमफेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या (कांस्यपदक) लढतीत साताऱ्याच्या सागर सूळने उस्मानाबादच्या दत्ता मेटेवर 5-4 अशी मात करत कांस्यपदकाची कमाई केली.
सेमीफायनलचा थरार
61 किलो वजनी गटात गादी विभागाच्या सेमीफायनलमध्ये कल्याणच्या जयेश साळवीने नाशिकच्या सागर बर्डेचा 10-0 असा पराभव करून अंतिमफेरी गाठली. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने जालन्याच्या अक्षय धानोरेवर 4-2 अशी मात करून अंतिमफेरी गाठली आहे.
तिसऱ्या (कांस्यपदक) क्रमांकासाठी झालेल्या नाशिकच्या सागर बर्डेने औरंगाबादच्या नुमेश पिंपळेचा 8-2 अशा गुण फरकाने पराभव करून कांस्यपदक पटकाविले, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विजय पाटीलनेही जालन्याच्या अक्षय धानोरेवर 10-0 अशी मात करत कांस्यपदक जिंकले.
70 किलो गादी विभागातल्या उपांत्य लढतीत कोल्हापूरच्या स्वप्नील पाटीलने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीला 4-3 ने हरवत अंतिम फेरीत धडक मारली. पुण्याच्या शुभम थोरातने सोलापूरच्या धिरज वाघमोडेला 8-2 अशा गुणाधिक्क्याने पराभव करून अंतिमफेरी गाठली.
या गटातील कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीने लातूरच्या आकाश देशमुखचा 7-2 अशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक पटकाविले. तर सोलापूरच्या धीरज वाघमोडेनेही साताऱ्याच्या आकाश मानेवर 8-5 अशी मात करून कांस्यपदक जिंकले.
गतविजेता अभिजित कटकेच्या लढतीकडे लक्ष
70 किलो गादी विभागाच्या सेमीफायनलमध्ये पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोपडेने लातूरच्या चंद्रशेखर पाटीलवर 2-0 अशी मात करून अंतिमफेरीत धडक मारली, तर दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीत अहमदनगरच्या अक्षय कावरेने कोल्हापूरच्या इंद्रजित मगदुमचा 12-1 अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर माती विभागातून अरुण खेगळे हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
शुक्रवार सकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटाचे ड्रॉही पाडण्यात आले असून, गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि मागल्या वर्षी दुखापतीमुळे पहिल्याच फेरीतून बाहेर पडलेला शिवराज राक्षे यांच्यात लढत होणार असून विक्रम वडतिले विरूद्ध विष्णू खोसे, गुलाबराव आगरकर विरुद्ध महेश वरुटे, मुन्ना झुंजुरके विरुद्ध समाधान पाटील अशा काही चटकादार कुस्त्या आज संध्याकाळच्या क्षेत्रात पाहायला मिळणार आहेत.