Maharashtra Kesari 2022 : आजपासून महाराष्ट्र केसरीला साताऱ्यात सुरुवात, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी राज्यभरातील मल्ल साताऱ्यात (Satara) दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
सातारा – महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी राज्यभरातील मल्ल साताऱ्यात (Satara) दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य कुस्तीगीर परिषद आणि जिल्हा तालीम संघाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्र केसरी स्पर्धा अत्यंत मानाची मानली जाते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्या प्रयत्नामुळे तब्बल 61 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीचे यजमानपद साताऱ्याला मिळाले आहे. पाच दिवस चालणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विविध वजनी गटात सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात कुस्त्या होणार आहेत.
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मातीचे दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत. तर गादी प्रकारातील आखाडे सुध्दा तयार करण्यात आले आहेत. तयार करण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यांमुळे सातारकरांना दोन सत्रात कुस्तीची रंगत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे एकाचवेळी 55 हजार प्रेक्षक एकाचं वेळी कु्स्ती पाहू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी अधिक गर्दी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
माती उकरण्यासाठी आखाड्यात मजूर
कुस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या आखाड्यात तब्बल 20 मजूरांची नेमणूक करण्यात आली आहे. झालेल्या प्रत्येक कुस्तीनंतर घट्ट झालेली माती उकरण्याचे किंवा विस्तारीत करण्याचे काम हे मजूर करतील.
आखाड्यात तब्ब्ल दहा ट्रक माती
तयार करण्यात आलेल्या एका आखाड्यात दहा ट्रक माती वापरण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही माती पुर्णपणे चाळलेली आहे. त्यामध्ये हळद, काव, दूध, दही, तुप, लिंबू आणि कापूर मिसळण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक आखाड्याला पाच लाख रूपये खर्च आला आहे.
33 लाखांची बक्षिसे
महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे. माती आणि गादी विभागात 57 ते 125 किलोच्या गटामध्ये विजेत्यांना 33 लाख रूपयांची बक्षिसे दिली. माती व गादी या दोन्ही विभागांमध्ये पहिल्या तीन विजेत्यांना रोख स्वरूपात मानधन देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ आणि सहभाग नोंदवणाऱ्या स्पर्धकांना देखील फुल ना फुलाची पाकळी मिळणार आहे.