मयंक अग्रवालने कोल्हापूरच्या फलंदाजाचा विक्रम ऑस्ट्रेलियात मोडला
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा युवा फलंदाज मयंक अग्रवालने अर्धशतकी पदार्पण साजरं केलं. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणात अर्धशतक ठोकणारा तो केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दबाव झुगारत पदार्पणाच्या सामन्यातच अग्रवालने 76 धावांची खेळी केली. मयंकच्या अगोदर मराठमोळे क्रिकेटपटू दत्तू फडकर यांनी ऑस्ट्रेलियात पदार्पणातच अर्धशतकी खेळी केली होती. 12 डिसेंबर 1947 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीच्या […]
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा युवा फलंदाज मयंक अग्रवालने अर्धशतकी पदार्पण साजरं केलं. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणात अर्धशतक ठोकणारा तो केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दबाव झुगारत पदार्पणाच्या सामन्यातच अग्रवालने 76 धावांची खेळी केली.
मयंकच्या अगोदर मराठमोळे क्रिकेटपटू दत्तू फडकर यांनी ऑस्ट्रेलियात पदार्पणातच अर्धशतकी खेळी केली होती. 12 डिसेंबर 1947 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीच्या मैदानावर दत्तू फडकर यांनी पदार्पण केलं होतं आणि याच सामन्यात त्यांनी अर्धशतकी खेळी केली. 51 धावांची खेळी करत 14 धावा देत तीन विकेट्सही त्यांनी घेतल्या होत्या. अष्टपैलू क्रिकेटर अशी त्यांची ओळख होती.
71 वर्षांनी दत्तू फडकर यांचा विक्रम मोडण्यात भारतीय फलंदाजाला यश आलं. मयंक हा ऑस्ट्रेलियात पदार्पणात अर्धशतक करणारा दुसराच भारतीय ठरला आहे. सोबतच कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच अर्धशतक ठोकणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरलाय. मयंकने 161 चेंडूंचा सामना करत 76 धावांची खेळी केली, ज्यामध्ये आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मयंकने 95 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं.
बॉक्सिंग डे कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी सलामीला उतरले होते. विहारी केवळ आठ धावा करुन माघारी परतला. पण मयंकने टिच्चून फलंदाजी करत चेतेश्वर पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली.
या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताने दोन बाद 215 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा सध्या खेळपट्टीवर आहेत.