धोनीने निवृत्ती घ्यावी ही कुटुंबीयांचीही इच्छा, धोनीच्या प्रशिक्षकांचा दावा
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर जोरदार खल सुरु आहे. धोनीने निवृत्त व्हावं असं अनेकजण म्हणत आहेत, तर धोनीने अजून खेळत राहावं, असाही एक मतप्रवाह आहे.
MS Dhoni Retirement रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर जोरदार खल सुरु आहे. धोनीने निवृत्त व्हावं असं अनेकजण म्हणत आहेत, तर धोनीने अजून खेळत राहावं, असाही एक मतप्रवाह आहे.
धोनीच्या निवृत्तीवरुन एकीकडे हा वाद सुरु असताना, धोनीचे बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी केलेला दावा विचार करायला लावणारा आहे. धोनीच्या आई-वडिलांनाही त्याने निवृत्ती घ्यावी असं वाटतं असल्याचं केशव बॅनर्जी यांनी सांगितलं.
केशव बॅनर्जी हे रविवारी धोनीच्या रांचीतील जुन्या घरी त्याच्या आई-वडिलांना भेटले. त्यावेळी धोनीने आता निवृत्ती घ्यावी अशी इच्छा आई-वडिलांनी केशव बॅनर्जींकडे व्यक्त केली.
केशव बॅनर्जी म्हणाले, “धोनीच्या कुटुंबीयांनी मला सांगितलं की धोनीने निवृत्त घ्यावी अशी संपूर्ण मीडियाची इच्छा आहे. आम्ही जेव्हा याचा विचार करतो, तेव्हा आम्हालाही ते योग्य वाटतं. आम्ही आता ही मोठी संपत्ती सांभाळू शकत नाही”
यावेळी केशव बॅनर्जी यांनी धोनीला पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 विश्वचषकात खेळू देण्याची विनंती त्याच्या आई-वडिलांकडे केली. टी 20 विश्वचषक 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे.
38 वर्षीय धोनीने नुकत्याच झालेल्या वन डे विश्वचषकातील 8 सामन्यात 273 धावा केल्या. धोनीच्या संथ खेळीवर टीका झाली. विश्वचषकाचा दावेदार असलेल्या भारतीय संघाला सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे भारतीय संघात आता फेरबदलाची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये पहिलं नाव धोनीचं घेतलं जात आहे.