JIO IPL : फुकटाची गोळी, कमाईची खेळी! जिओवर आयपीएल फुकटात दाखवून मुकेश अंबानी असे होणार मालामाल
JIO IPL : मुकेश अंबानी यांची जिओ कंपनी आयपीएएल मोफत दाखविणार आहे. पण यामागे रिलायन्सची कमाईची खेळी आहे. मुकेश अंबानी यांचे बिझनेस कौशल्य पाहुन तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
नवी दिल्ली : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी जिओ (JIO), आयपीएल (IPL) मोफत दाखवणार आहे. इतर स्ट्रीमिंग कंपन्यांना मात देत अंबानी मोठी व्यावसायिक खेळी खेळणार आहे. अर्थात आयपीएल मोफत दाखविण्यामागील निर्णयाची मशागत आतापासून करण्यात येत नाही. गेल्या वर्षभरापासून याविषयीची तयारी सुरु होती. त्यासाठी पॅरामाऊंट ग्लोबल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित Viacom-18 ने IPL चा ब्रॉडकॉस्ट मीडिया अगोदरच ताब्यात घेतला होता. गेल्या वर्षी यासंबंधीची $2.7 अब्जची डील पूर्ण झाली. अर्थात हा सौदा सहजासहजी झाला नाही. आयपीएलचे हक्क विकत घेण्यासाठी वायाकॉमने बाजारातील डिस्ने प्ल्स हॉटस्टार, सोनी ग्रूपसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना आस्मान दाखविले. यापूर्वी डिस्नेने आयपीएलचा मीडिया हक्क मिळविला होता. क्रिकेटप्रेमींना सबस्क्रिप्शनच्या आधारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर या खेळाचा आनंद लुटता येईल.
पण याच दरम्यान अंबानी यांनी व्यावसायिक कौशल्यपणाला लावले. Viacom मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग ऑफर देणार असल्याने प्रेक्षकांच्या, क्रीडा प्रेमींच्या आणि किक्रेटप्रेमींच्या उड्या पडतील हे वेगळं सांगायला नको. या व्यावसायिक खेळीतून जिओला मोठा फायदा होणार आहे. ऑनलाईन जाहिरातीतून मोठे उत्पन्न मिळेल अशी Viacom ला आशा आहे.
भारतात सध्या गुगल आणि फेसबुक फ्री स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ऑनलाईन जाहिरातीतून अब्जावधींची उलाढाल होत आहे. अनेक जण या जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी डॉलरची कमाई करत आहेत. Netflix च्या सबस्क्रिप्शनपेक्षा हे अधिक फायदेशीर आहे. क्रीडा प्रेमींना मोफत मॅचेस पहायला मिळतील. तर जिओला जाहिरतीतून मोठे उत्पन्न मिळेल.
550 दशलक्ष दर्शक आयपीएल ऑनलाइन पाहतील, असा दावा वायाकॉमच्या सूत्रांनी केला आहे. हा आकडा फार मोठा आहे. त्याचा संपूर्ण फायदा कंपनी घेईल. कंपनीचे संपूर्ण तंत्रज्ञान, मनोरंजन ब्रँडिंग, ऑनलाइन रिटेल व्यवसाय झपाट्याने वाढण्यासाठीही या प्रेक्षकांचा मोठा उपयोग होईल.
या 31 मार्चपासून यंदाच्या आयपीएलचा नारळ फोडल्या जाणार आहे. आयपीएलचे हे तुफान 8 आठवडे धुमाकूळ घालणार आहे. वायाकॉम प्रत्येक सामाना अगदी मोफत दाखविणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना याची देही, याची डोळा या थरारनाट्याचा क्षण क्षणाचा अनुभव घेता येईल.
इंटरनेट कनेक्टिव्हिटी झक्कास असेल तर अडथळाविरहीत सामन्याचा आनंद लुटता येईल. त्यातच जिओने अनेक शहरात 4G, 5G सेवा सुरु केल्याने त्या माध्यमातून ही जिओला मोठा फायदा होणार आहे. म्हणजेच सर्वच बाजूने रिलायन्स समूहाला कमाईची मोठी संधी मिळणार आहे.
रिलायन्स जिओ सध्या सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे. कंपनीचे इंटरनेट पॅकेज इतर कंपन्यांच्या मानाने स्वस्त आहे. तसेच अनेक ऑफर्सही त्यावर आहेत. त्यांची ग्राहकांची संख्याही फार मोठी आहे. आयपीएल सामने मोफत पाहण्यासाठी आता लाखो युझर्स तगडे इंटरनेट पॅक रिचार्ज करतील. त्या माध्यमातून जिओची मोठी कमाई होईल. तर जाहिरातीतूनही मोठे उत्पन्न येईल.