… म्हणून धवनच्या जागी कुणालाही संधी नाही : विराट कोहली
शिखर धवनच्या जागी कोण हा मोठा प्रश्न आहे, पण कर्णधार विराट कोहलीने यावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. धवन दुखापतग्रस्त होऊनही अधिकृतपणे त्याच्या जागी कुणालाही का संधी दिली नाही या प्रश्नावर विराटने उत्तर दिलं.
लंडन : विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने शानदार विजय मिळवला. पण भारताच्या विजयाचा हिरो शिखर धवनला दुखापत झाली. या खेळीच्या दरम्यानच त्याच्या बोटाला जखम झाली, ज्यामुळे पुढच्या काही सामन्यांमध्ये त्याला खेळता येणार नाही. शिखर धवनच्या जागी कोण हा मोठा प्रश्न आहे, पण कर्णधार विराट कोहलीने यावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. धवन दुखापतग्रस्त होऊनही अधिकृतपणे त्याच्या जागी कुणालाही का संधी दिली नाही या प्रश्नावर विराटने उत्तर दिलं.
बोटाला दुखापत झाल्यामुळे शिखर धवनला पुढचे दोन आठवडे मैदानाबाहेर रहावं लागेल. त्याच्या जागी पर्याय म्हणून युवा खेळाडू रिषभ पंतला बोलावण्यात आलंय. पण धवनच्या रिप्लेसमेंटवर विराट म्हणाला की, टीम मॅनेजमेंटने शिखर धवनला सलामीवीर म्हणूनच उतरवण्याचा निर्णय घेतलाय आणि तो लवकर बरा होईल ही मला अपेक्षा आहे. कारण, येणाऱ्या काही सामन्यांसोबतच धवनला सेमीफायनलमध्येही खेळायचं आहे. त्यामुळे त्याला टीमसोबत ठेवण्याचा निर्णय घेतलाय, असं विराटने न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर सांगितलं.
शिखर धवनच्या या दुखापतीबाबत टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनीही माहिती दिली. आम्ही त्याच्याकडून हलक्या चेंडूने तयारी करुन घेऊ, यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील चेंडूसोबत सराव केला जाईल, जे आव्हानात्मक असेल. धवनला यामध्ये यश मिळालं तर भारतीय संघासाठी ही आनंदाची बाब असेल, असं ते म्हणाले. भारत अजून सहा सामने खेळणार आहे. त्यामुळे शिखर धवनबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
शिखर धवनला पुढच्या किमान तीन सामन्यांमध्ये खेळता येणार नाही हे बीसीसीआय आणि टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी स्पष्ट केलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याचाही यामध्ये समावेश होता. हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यानंतर भारताचा सामना आता पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 16 जूनला होणार आहे.