महेंद्रसिंह धोनी वर्ल्डकपमध्ये व्यस्त, भारतात धोनीच्या भाड्याच्या घरात चोरी
उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे अनेक दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करत पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली. या चोरांनी ज्या घरांमध्ये चोरी केली, त्यापैकी एक घर भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीचंही होतं.
लखनऊ : उत्तर प्रदेशतील नोएडा येथे अनेक दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करत पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली. या चोरांनी ज्या घरांमध्ये चोरी केली, त्यापैकी एक घर भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीचंही होतं. नोएडाच्या सेक्टर 104 येथे धोनीचं घर आहे, जे त्याने भाड्याने दिलं आहे. इथे या चोरट्यांनी चोरी केली होती.
धोनीने हे घर विक्रम सिंग नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिलं आहे. विक्रमच्या घरी या चोरांनी चोरी केली. इथून त्यांनी एलईडी टीव्ही चोरला होता. घराच्या रिनोव्हेशनचं काम सुरु असताना ही चोरी झाली होती. त्याशिवाय चोरांनी डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डही (सीसीटीव्ही फुटेज) चोरी केला होता. यामाध्यमातून चोरांनी या चोरीचा सर्व डाटा नष्ट केला. जेणेकरुन पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.
हे चोरटे या परिसरात सामान विक्रेते म्हणून फिरायचे. त्यादरम्यान ते सर्व घरांची रेकी करत होते. रात्री परिसरातील सर्व घरांचे लाईट बंद होईपर्यंत ते वाट पाहायचे, लाईट बंद झाल्यावर ते त्यांच्या कामाला सुरुवात करायचे. घराचं टाळं तोडण्यापूर्वी ते अनेकदा बेल वाजवून कुणी घरात आहे की नाही हे सुनिश्चित करायचे. त्यानंतर ते घराचं कुलूप तोडायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
धोनीचं घर त्यांचं टार्गेट नव्हतं. या चोरट्यांनी त्या परिसरातील अनेक घरांमध्ये चोरी केली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरोधात 380 आणि 39 कलमांतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या हे तीनही चोरटे पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर यांच्या गँगचा आणखी एक चोरटा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.