एक ओव्हर, पाच सिक्स आणि 34 धावा, फलंदाजाचा मैदानात हाहाःकार
बे ओव्हल : न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशमने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत थिसारा परेराची जोरदार धुलाई केली. या षटकात त्याने पाच षटकारांसह एकूण 34 धावा कुटल्या, ज्यात एक नो बॉलचाही समावेश होता. वन डे इतिहासातलं हे सर्वात महागडं तिसरं षटक ठरलंय. नीशम वन डेमधील एक मोठा विक्रम स्वतःच्या नावावर करता करता राहिला. त्याला 13 चेंडूंच्या […]
बे ओव्हल : न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशमने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत थिसारा परेराची जोरदार धुलाई केली. या षटकात त्याने पाच षटकारांसह एकूण 34 धावा कुटल्या, ज्यात एक नो बॉलचाही समावेश होता. वन डे इतिहासातलं हे सर्वात महागडं तिसरं षटक ठरलंय. नीशम वन डेमधील एक मोठा विक्रम स्वतःच्या नावावर करता करता राहिला. त्याला 13 चेंडूंच्या त्याच्या डावात आणखी एक चेंडू मिळाला असता तरीही वन डे इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम नीशमच्या नावावर झाला असता.
नीशमची लय पाहता तो अर्धशतक करण्यापासून रोखू शकतं असं वाटत नव्हतं. वन डे इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर आहे. त्याने 16 चेंडूत अर्धशतक केलं होतं. तर नीशमने 13 चेंडूत 47 धावा केल्या. वन डे इतिहासातील सर्वात मोठा विक्रम करण्यापूर्वीच 50 षटकं पूर्ण झाली होती.
अखेरच्या षटकाची जबाबदारी थिसारा परेरावर होती. मार्टिन गप्टिन 139, केन विल्यम्सन 76 आणि रॉस टेलर 54 यांच्या खेळीने न्यूझीलंडला मजबूत स्थितीत आणलं होतं. यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नीशम आला. त्याने झटपट खेळी करण्यास सुरुवात केली. परेरासाठी हे षटक एवढं वाईट होतं, की तो कधीही हा क्षण विसरु शकणार नाही.
नीशमने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. परेराने पहिल्या चेंडूप्रमाणेच दुसराही चेंडू फेकला आणि पुन्हा तोच परिणाम मिळाला. तिसराही षटकार ठोकल्यानंतर चौथा चेंडू फुलटॉस फेकला, पुन्हा मोठा षटकार पाहायला मिळाला. परेरा आता वैतागला होता. पाचवा चेंडू फुलटॉस टाकला, जो नो बॉल होता. नीशमने पळून दोन धावा काढल्या. शिवाय फ्री हीट देखील मिळाली. पाचव्या चेंडूवर नीशमने षटकार ठोकला, तर अखेरच्या चेंडूवर एक धाव घेतली. अशा प्रकारे 6 6 6 6 nb+2 6 1 एकूण 34 धावा या षटकात मिळाल्या.
वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात महागड्या षटकाचा नकोसा विक्रम नेदरलँड्सच्या नावावर आहे. 2007 सालच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्शल गिब्सने सलग सहा षटकार ठोकत वॅन बुंगे या गोलंदाजाला घाम फोडला होता. यानंतर 2013 मध्ये थिसारा परेरानेही दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आर. पीटरसनची धुलाई करत वन डे इतिहासातलं सर्वात महागडं दुसरं षटक खेळून काढलं. पाच षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने परेराने 35 धावा काढल्या होत्या.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलिअर्सचं नाव आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 2014-15 मध्ये जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर 34 धावा केल्या होत्या. याच विक्रमाची बरोबरी आता नीशमने केली आहे.
न्यूझीलंडने या सामन्यात सात बाद 371 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेचा डाव 326 धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडने 45 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेकडून कुसल परेराने 102 धावांची शतकी खेळी केली. निरोशन डिकवेला (76), दनुष्का गुणतिलका (43) यांच्याव्यतिरिक्त कुणालाही खास कामगिरी करता आली नाही.