Asian Champions Trophy : हॉकी टीम इंडियाची विजयी सलामी, पहिल्याच सामन्यात चीनला लोळवलं
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं होतं. आता टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने चीनला नमवलं. टीम इंडियाने मागच्या वर्षी हा किताब जिंकला होता.
आशिया कप 2024 स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. आतापर्यंत भारताने चार वेळा आशिया कप स्पर्धेवर नाव कोरलं आहे. आता पाचव्या जेतेपदासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चीनवर दणदणीत विजय मिळवला आहे. तीनला 3-0 ने पराभूत केलं आहे. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात टीम इंडियाची आगेकूच सुरु झाली आहे. रॉबिन राउंड आधारावर ही स्पर्धा खेळली जात असून एकूण सहा संघ आहेत. भारताने चार सत्रातील पहिल्या सत्रापासून आक्रमक पवित्रा घेतला. चीनला डोकं वर काढू दिलं नाही. सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या सत्राच्या 14 व्या मिनिटाला गोल झाला. सुखजीतच्या स्टिकवरून डिफ्लेक्ट होत चेंडू चीनच्या गोलपोस्टमध्ये घुसला. त्यानंतर दुसऱ्या सत्रातही भारताने आघाडी घेतली. उत्तम सिंहने गोल केला आणि टीम इंडिया मजबूत स्थितीत आली.
तिसऱ्या सत्रात टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावलेला होता. तर चीनचा संघ बरोबरी साधण्यासाठी धडपड करत होता. पण त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत भारताने आणखी एक गोल केला आणि 3-0 ने आघाडी घेतली. अभिषेकने तिसऱ्या सत्रात गोल केला. चौथ्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. भारताने सामन्यात 3-0 ने आघाडी घेतली आणि विजय मिळवला. प्रशिक्षक कोच क्रेग फुल्टन यांच्या प्रशिक्षणार्थी संघात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडू आहे.
दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश याने निवृत्ती घेतल्यानंतर या त्याच्या जागा कशी भरून निघते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. गोलकीपर कृष्ण बहादूर पाठककडे नजरा खिळल्या होत्या. तसं पाहिलं तर पाठकने निराश केलं नाही पण त्याची पुढची अशीच राहावी अशी क्रीडाप्रेमींची आशा आहे. भारताचा पुढचा सामना 9 सप्टेंबरला जापानशी होणार आहे. दुसरीकडे, जापान आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामना पार पडला. हा सामना 5-5 ने बरोबरीत सुटला. तर पाकिस्तान- मलेशिया सामना देखील 2-2 ने बरोबरीत सुटला. त्यामुळे गुणतालिकेत भारतीय संघ आघाडीवर आहे.