Asian Champions Trophy 2024 : टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक, सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाला 4-1 ने नमवलं
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेत टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. साखळी फेरीत सलग पाच सामने जिंकून भारताने उपांत्य फेरी गाठली होती. आता दक्षिण कोरियाला पराभूत करत टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण कोरिया हे संघ आमनेसामने आले होते. या स्पर्धेत भारताने साखळी फेरीपासूनच वर्चस्व कायम ठेवलं होतं. साखळी फेरीत एका पाठोपाठ एक पाच संघांना पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे टीम इंडियाचं वजन या सामन्यात आधीच होतं आणि झालंही तसंच..सामन्याच्या पहिल्या हाफमधील पहिल्या सत्रापासून भारताने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या सत्राच्या शेवटी भारताच्या उत्तम सिंगने गोल मारला आणि 1-0 ने आघाडी मिळवून दिली. शेवटच्या मिनिटाला दक्षिण कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. दुसऱ्या सत्रात भारताला काही मिनिटातच पेनल्टी कॉर्नर मिळाला. कोरियाने रेफरल घेतला होता. पण निर्णय भारताच्या बाजूने लागला. या संधीचं सोनं कर्णधार हरमनप्रीत सिंगने केलं. पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये केलं आणि भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या अर्ध्या तासावर भारताने वर्चस्व गाजवलं.
दुसऱ्या हाफच्या तिसऱ्या सत्रात भारताचा आत्मविश्वास आणखी दुणावलेला दिसला. जरमनप्रीत सिंगने तिसरा गोल मारत दक्षिण कोरियाला बॅकफूटवर ढकललं. पण तीन गोलची आघाडी पुन्हा एकदा एका गोलने कमी झाली. दक्षिण कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि गोल मारण्यात यश मिळालं. त्यामुळे 3-1 अशी स्थिती आली. भारताला चौथा गोल करण्याची संधी चालून आली होती. पण सुखजीत सिंगला गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही. पण तिसरं सत्र संपण्यासाठी अवघे काही सेकंद शिल्लक असताना हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये केलं. तिसरा सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताने 4-1 ने आघाडी घेतली. हरमनप्रीत सिंगने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 7 गोल मारले आहेत. चौथ्या सत्रात दोन्ही बाजूने एकही गोल झाला ाही. भारताने या विजयासह दक्षिण कोरियाविरुद्ध 39 व्या विजयाची नोंद केली आहे. दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर 39-11 अशी आहे.
टीम इंडिया : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), क्रिशन पाठक (गोलकीपर), जरमनप्रीत सिंग, सुमीत, अमित रोहिदास, मनप्रीत सिंग, विकेट सागर प्रसाद, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजीत सिंग, अरजीतसिंग हुंदाल.