Asian Games : भालाफेकपटू नीरज चोप्राने जिंकलं सुवर्ण पदक, भारताची मेडल संख्या 80 च्या पार
Asian Games : भालाफेकपटू नीरज चोप्रा याने एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. नीरज चोप्रा याने दुसऱ्यांदा एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. तर किशोर जेना याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.
मुंबई : एशियन गेम्स स्पर्धेत भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे चांगली आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. त्यामुळे तमाम क्रीडाप्रेमी या खेळाकडे अपेक्षेने पाहात होता. अखेर अपेक्षेप्रमाणे नीरज चोप्रा याने कामगिरी केली आणि सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत नीरज चोप्राला दोनदा भाला फेकावा लागला. नीरज चोप्रा याने पहिला थ्रो जवळपास 89 मीटरपर्यंत केला होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हा रेकॉर्ड नोंदवला गेला नाही. त्यामुळे नीरज चोप्रा याला पुन्हा एकदा भाला फेकावा लागला. यावेळी भाला 82.38 मीटरपर्यंत मजल गाठू शकला. तर भारताच्या किशोर जेना याने पहिल्या फेरीत 81.26 मीटर लांब भाला फेकला.
दुसऱ्या फेरीत नीरजने 84.49 मीटर लांब भाला फेकला. तर किशोर जेना याने 79.76 मीटर पर्यंत मजल मारली. पण दुसरा थ्रो फाउल असल्याचं सांगितलं गेलं. मात्र रिव्ह्यूत त्याचा थ्रो योग्य असल्याचं दिसून आलं. नीरज चोप्रा याचा तिसरा थ्रो फाउल ठरला. किशोर जेना याने तिसऱ्या प्रयत्नात 86.77 मीटर लांब भाला फेकला. यामुळे रँकिंगमध्ये पहिल स्थान पटकावलं. नीरज चोप्राने चौथ्या फेरीत 88.88 इतका लांब थ्रो केला. किशोर जेना याने 87.4 मीटर लांब भाला फेकला.
Hangzhou Asian Games: Neeraj Chopra bags gold medal in Javelin throw with the best throw of 88.88 metres. Kishore Jena clinches silver medal pic.twitter.com/dmeg6meLX1
— ANI (@ANI) October 4, 2023
भारताच्या नीरज चोप्राला सुवर्ण पदक, किशोर जेना याला रौप्य, तर जापानच्या रोडरिक जेनकी डीन याला कांस्य पदक मिळालं. नीरज चोप्रा याने 2018 मध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं.
दुसरीकडे, भारताच्या पुरुष संघाने 4×400 मीटर रिलेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या नीरज चोप्राने रिले टीमसोबत जात आनंद साजरा केला. यावेळी किशोर जेनाही उपस्थित होता.