Beijing Olympics 2008: अभिनव बिंद्राची सुवर्ण कामगिरी, बीजिंग ऑलिम्पिक भारतासाठी अविस्मरणीय
Beijing 2008 Olympics: 2008 ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन हे चीनची राजधानी बिजिंगमध्ये करण्यात आलं होतं. या स्पर्धेत भारताच्या एकूण 57 खेळाडूंनी 12 विविध खेळांमध्ये सहभाग घेतला होता.
भारतीय खेळाडूंनी 2016 च्या रियो ऑलिम्पिकमधील निराशानजनक कामगिरीची भरपाई ही 2020 च्या स्पर्धेत 7 पदकं जिंकून केली. भारतासाठी टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा ही ऐतिहासिक राहिली. भारताने या ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 7 मेडल्स जिंकले. आता भारताचे 112 खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज आहेत. या स्पर्धेला येत्या 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. खेळाडूंनी या स्पर्धेत टोक्यो ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडीत काढावा, अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताने 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये की कामगिरी केली होती? हे जाणून घेऊयात.
बिजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या खेळाडूने पहिल्यांदा वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवलं. त्याआधी भारताकडून अथेन्स 2004 ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन राठोड याने आणि 1900 सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी रौप्य पदक पटकावलं होतं. तसेच सुशील कुमारने भारताला 1952 च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकनंतर कु्स्तीतील पदक मिळवून दिलं.
विजेंदर सिंह याने बॉक्सिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आणि इतिहास रचला. विजेंदर कुमार बॉक्सिंगमध्ये पदक मिळवणारा पहिला भारतीय ठरला. इतकंच नाही, तर भारताने तेव्हा 1 गोल्ड आणि 2 ब्राँझसह ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक मेडल्स जिंकण्याची कामगिरी केली. त्याआधी भारताने 1900 आणि 1952 साली 2-2 मेडल्स जिंकले होते. भारताने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये हा विक्रमही मोडीत निघाला, तेव्हा 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकं मिळवली.
अभिवन बिंद्रा हा भारताचा बिजिंग ऑलिम्पिकमधील हिरो ठरला. अभिनवने या स्पर्धेत पदकांचं खातं उघडलं. अभिवनने 10 मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल मिळवला. अभिनवने भारताची तब्बल 28 वर्षांची प्रतिक्षा संपवून सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याआधी हॉकी टीम इंडियाने 1980 साली गोल्ड मेडल मिळवलं होतं.
अभिनवने त्याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत 2 गोल्ड मेडलची कमाई केली होती. मात्र अभिनवची कशीबशी बिजिंग ऑलिम्पिक फायनलमध्ये एन्ट्री झाली. मात्र अभिनवने फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली. अभिनवने फायनलमधील प्रत्येक शॉटमध्ये 10 पॉइंट्स मिळवले आणि गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं.
टीम इंडियाचे पोस्टर बॉईज
अभिनव बिंद्रा, सुशीलकुमार आणि विजेंदर सिंह हे तिघे भारतासाठी पोस्टर बॉईज ठरले. तर दुसऱ्या बाजूला काही खेळाडू जवळ येऊनही मेडल्स जिंकण्यात अपयशी ठरले. भारताच्या तिरंदाजी संघात डोला बॅनर्जी, बोम्बायला देवी आणि प्रणिता वर्धनेनी या तिघी क्वार्टर फायनलपर्यंत पोहचल्या. मात्र यांना पुढील फेरीसाठी पात्र होता आलं नाही. तसेच गीता मंजीत कौर, सीनी जोस, चित्रा सोमन आणि मनदीप कौर यांचं 400 मीटर आणि रिले रेस स्पर्धेत सेमी फायनलआधीच आव्हान संपुष्टात आलं.
क्वार्टरफायनलमध्ये अपयश
क्वार्टरफायनलमध्ये भारतीय खेळाडू अपयशी ठरले. बॅडमिंटनपटू सायना नेहवालने क्वार्टर फायनलपर्यंत दमदार कामगिरी केली. मात्र सायनाला क्वार्टफायनलमधील शानदार सुरुवातीनंतरही पराभवाचा सामना करावा लागला. सायनाला इंडोनेशियाच्या मारिया क्रिस्टिन हीने पराभूत केलं. तर बॉक्सर जितेंद्र कुमार आणि अखिल कुमार, शूटर गगन नारंग आणि टेनिसपटू महेश भूपती आणि लिएंडर पेस या सर्वांचं क्वार्टर फायनलमध्येच आव्हान संपुष्टात आलं.
हॉकी टीम अपयशी
भारतीय हॉकी संघाचा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण इतिहास राहिला आहे. हॉकी टीमने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये 8 गोल्डसह एकूण 12 मेडल्स जिंकली आहेत. मात्र हॉकी टीम इंडियासाठी बिजिंग ऑलिम्पिक एका वाईट स्वप्नाप्रमाणे होतं. टीम इंडिया 80 वर्षांमध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय करण्यात अपयशी ठरली.
भारताला वेटलिफ्टिंगमध्ये मोठा झटका लागला. वेटलिफ्टिंग टीमने 2006च्या राष्टकुल स्पर्धेनंतर वेटलिफ्टर मोनिका देवीचं डोपिंगमुळे 2 वर्षांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे मोनिका देवीला बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आलं नाही. मोनिका देवीला 9 ऑगस्टला क्लिन चीट मिळाली. मात्र तोवर फार उशीर झाला होता.