महाराष्ट्र केसरी होताच 2 तासातच शिवराज राक्षे याला मिळाली मोठी गुडन्यूज
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पुण्यातील खेडमधील पैलवान शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी ठरला. शिवराजने या अंतिम सामन्यात नांदेडच्या महेंद्र गायकवाड याला अस्मान दाखवलं आणि मानाची गदा पटाकावली.
मुंबई : महाराष्ट्र केसरी कोण होणार, मानाची गदा कोण पटकवणार या प्रश्नांना अखेर पूर्णविराम मिळालंय. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पुण्यातील खेडमधील पैलवान शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी ठरला. शिवराजने या अंतिम सामन्यात नांदेडच्या महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवलं. शिवराजने अवघ्या काही सेंकदात सामना फिरवला आणि महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. शिवराजने महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर वडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दिली. सोबतच अवघ्या 2 तासात शिवराजसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
शिवराजला शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य देणार असल्याचा शब्द मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत शिवराजचं अभिनंदन केलं. त्यानंतर सरकारी नोकरीत प्राधान्य देणार असल्याचं म्हटलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?
“प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर चा मल्ल शिवराज राक्षे विजयी ठरला आहे. या विजयानंतर त्याला चांदीची गदा आणि ५ लाख रुपये रोख तसेच थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. मॅटवर रंगलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चितपट करणाऱ्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच राज्य सरकारकडून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला सरकारी नोकरीत नक्की प्राधान्य देण्यात येईल असेही जाहीर करतो.”, असं मुख्यमंत्र्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांचं ट्विट
मॅटवर रंगलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चितपट करणाऱ्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच राज्य सरकारकडून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला सरकारी नोकरीत नक्की प्राधान्य देण्यात येईल असेही जाहीर करतो.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 14, 2023
शिवराज राक्षेची पहिली प्रतिक्रिया
“मी गेल्या 12 वर्षांपासून तपश्चर्या करत होतो. आता मला त्याचं फळ मिळालं आहे. मध्यंतरी मला दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्यावर्षी मला स्पर्धेत सहभागी होता आलं नव्हतं. माझं ऑलिम्पिक टार्गेट आहे. माझ्या आई-वडिलांना खूप आनंद झाला असेल. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं”, शिवराजने अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी गदा पटकावल्यानंतर दिली.
या मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेला दिग्गजांसह राजकीय नेत्यांचीही उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंसाठी महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या.
“महाराष्ट्रातील खेळाडू नक्कीच मेडल मिळवणार. आपल्या राज्यात खेळाडूंना 2 वर्षांपासून मानधन मिळत नाहीय. जे 6 हजार मानधन मिळत होते ते आता 20 हजार करणार. तसेच “वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार मानधन आहे ते आता साडे सात हजार करु”,असा शब्द फडणवीस यांनी दिला. फडणवीस यांनी यावेळी सुरु केला.