Paris Olympics 2024: 14 ते 44 वर्षे…! भारताच्या तरुण आणि वयस्कर खेळाडूंची रंगली चर्चा, कोण ते जाणून घ्या
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून 117 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यावेळी टोक्यो ऑलिम्पिकपेक्षा जास्त पदकांची अपेक्षा भारतीय क्रीडाप्रेमींना आहे. दरम्यान, भारताच्या ताफ्यातील दोन खेळाडूंची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यात एकाचं वय 14, तर एकाचं वय 44 आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताची कामगिरी हवी तशी झालेली नाही. पण गेल्या काही वर्षात ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सरकारकडून भरीव मदत होत आहे. खेळाडू घडवण्यासाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पदकांची भूक वाढली आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एका सुवर्ण पदकासह सात पदकं मिळवली होती. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. भारताने आतापर्यंत एकूण 33 पदकं मिळवली असून त्यात 10 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यात 8 सुवर्णपदकं ही हॉकीमध्ये मिळाली आहेत. तर वैयक्तिक पातळीवर नेमबाजीत अभिनव बिंद्राने, भालाफेकीत नीरज चोप्राने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त पदकं पदरी पडावी अशी अपेक्षा आहे. दरम्यान भारतीय चमूत एकूण 117 खेळाडू आहेत. यापैकी दोन खेळाडूंची चर्चा सर्वाधिक आहे. या दोघांचं वय स्पर्धेपूर्वी चर्चेचं कारण ठरलं आहे. यात 14 वर्षांची धिनिधी देसिंघु आणि 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना यांचा समावेश आहे.
ऑलिम्पिक गेम्स त्रिसदस्यीय समितीने युनिवर्सालिटी कोटा बहाल केल्यानंतर 14 वर्षीय धिनिधी ही पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे. धिनिधी आात नववीत शिकत असून पहिली ऑलिम्पिक स्पर्धा खेळणार आहे. ती महिलांच्या 200 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत भाग घेणार आहे. तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. यापूर्वी धिनिधीने 2022 एशियन्स गेम्स आणि 2024 मध्ये दोहा येथील जागतिक जलतरण चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे. पण ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सर्वात कमी वयात भाग घेण्याचा विक्रम आरती साहाच्या नावावर आहे. तिने 1952 मध्ये 11 वर्षांची असताना हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.
दुसरीकडे, रोहन बोपण्णा हा भारतीय चमुतील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याचं वय 44 असून तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार आहे. बालाजीसोबत दुहेरीत उतरणार आहे. त्यामुळे दुहेरीत भारताला पदकाची अपेक्षा आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत बोपण्णा पात्र ठरला नव्हता. मात्र जागतिक क्रमवारी 4थ्या स्थानावर राहिल्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला एन्ट्री मिळाली. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एबडेन यांनी जेतेपद जिंकलं होतं. फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीतही या जोडीने प्रवेश केला होता. दरम्यान, बोपण्णा 2012 मध्ये महेश भूपतीसोबत ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला होता. त्यानंतर 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये बोपण्णा पुरुष दुहेरीत लिएंडर पेससोबत खेळला होता.