Football World Cup 2026 : भारतासमोर कतारचं कडवं आव्हान, पात्र ठरण्यासाठी विजय महत्त्वाचा
India Vs Qatar Match : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पराभवामुळे कोट्यवधी भारतीयांचा हिरमोड झाला आहे. आता पुढचा वनडे वर्ल्डकप आता 2027 ला आहे. त्यामुळे आता अजून चार वर्षे वाट पाहावी लागणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रीडाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. फुटबॉल वर्ल्डकप पात्रतेसाठीचा महत्त्वाचा सामना भारत आणि कतार यांच्यात होणार आहे.
मुंबई : फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा 2026 साली कॅनडा, मेक्सिको आणि युनाईटेड स्टेटमध्ये संयुक्तरित्या होणार आहे. फुटबॉल वर्ल्डकपचं हे 23 वं पर्व असणार आहे. एकूण 48 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. 16 स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन केलं जात आहे. 2022 फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत 32 संघांनी भाग घेतला होता. आता यात 16 संघांची आणखी भर पडणार आहे. या स्पर्धेत पात्र होण्याची टीम इंडियाला मोठी संधी आहे. आशिया खंडातून 2026 वर्ल्डकपसाठी 8 संघ पात्र ठरणार आहेत. आशिया खंडातून 36 टीम यासाठी लढणार आहेत. भारतीय संघही या शर्यतीत आहे. 36 संघांचं 9 गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. प्रत्येक गटातून टॉप दोन संघ पुढच्या फेरीत धडक मारतील. एक सामना घरच्या मैदानावर तर प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर असणार आहे.
गट अ मध्ये भारत, कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. पहिल्या सामन्यात भारताने कुवैतला 1-0 ने पराभूत केलं आहे. कुवैतमध्ये हा सामना पार पडला. तर आता भारत आणि कतार यांच्यात 21 नोव्हेंबरला सामना होणार आहे. हा सामना भारतात भुवनेश्वरमध्ये होणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास पुढच्या फेरीसाठी दावा जवळपास मोकळा होणार आहे. कारण आपल्या गटात कतार बलाढ्य संघ आहे. भारताच्या तुलनेत कतारचं पारडं जड असल्याने हा सामना जिंकावा अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. भारतीय संघ या गटात दुसऱ्या स्थानावर राहिल्यास पुढील 18 संघांमध्ये जागा मिळवेल. त्यानंतर 18 संघांमध्ये 8 स्थानासाठी लढत होईल. भारताने या ठिकाणी चांगली कामगिरी केली तर नक्कीच भारत फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसेल.
- भारत विरुद्ध कतार, 21 नोव्हेंबर 2023
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 21 मार्च 2024
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 26 मार्च 2024
- भारत विरुद्ध कुवैत, 11 जून 2024
भारतीय फुटबॉल संघ : सुनील छेत्री (कर्णधार), गुरप्रीत सिंग संधू (गोलकीपर), राहुल भेके, संदेश झिंगन, आकाश मिश्रा, सुरेश सिंग, मनविर सिंग, ललेंगमाविया, सहल अब्दुल समद, महेश नौरेम, निखिल पूजारी, विशाल कैथ (गोलकीपर), अमरिंदर सिंग (गोलकीपर), सुभाषिश बोस, लालचुंगनुंगा, अमिरूद थापा, लिस्टन कोलाको, उडांता सिंग, रोशन सिंग, लल्लियान्झुएला छागंटे, रोहित कुमार, मेहताब सिंग, राहुल केपी.