WITT 2024 | ‘खेलो इंडिया’मुळे भारतात इतर क्रीडा प्रकारांना बूस्टर, दिग्गज काय म्हणाले?
भारतात क्रिकेटमुळे इतर खेळाडूंचा विकास न झाल्याचं सर्रासपणे म्हटलं जातं. क्रिकेटमुळे इतर खेळांना आणि खेळाडूंना प्रसिद्धी मिळत नसल्याचंही म्हटलं जातं. मात्र आता भारतात तशी स्थिती राहिली आहे का? सध्या भारतात इतर खेळांची स्थिती काय आहे? याबाबत टीव्ही 9 च्या विशेष कार्यक्रमात चर्चा झाली.
नवी दिल्ली | भारत, क्रिकेट वेडा देश. क्रिकेट हा साऱ्या भारतीयांचा धर्म आणि सचिन तेंडुलकर हा त्यांचा देव. क्रिकेट खेळाची लोकप्रियता ही गल्ली क्रिकेटवरुन स्पष्ट होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत क्रिकेटची क्रेझ पाहायला मिळते. क्रिकेट जितका खेळायचा गेम आहे त्यापेक्षा जास्त बोलण्याचा गेम आहे. भारतातील चौकाचौकात क्रिकेटवर चर्चा रंगतात. मात्र या क्रिकेटमुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष झाल्याचा सूर आवळला जातो. मात्र हे चित्र गेल्या काही वर्षात बदललंय. कबड्डी, कुस्ती या आणि यासारख्या इतर मातीतल्या खेळांनाही ग्लॅमर प्राप्त झालंय. यामध्ये सरकारचाही मोठा हातभार राहिला आहे. भारतातील नंबर 1 न्यूज नेटवर्क टीव्ही 9 च्या विशेष कार्यक्रमातही केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी इतर खेळांसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं म्हटलं.
टीव्ही 9 च्या ‘इवेंट व्हाट इंडिया थिंक्स टुडे’च्या दुसऱ्या पर्वाला राजधानी नवी दिल्लीत रविवार 25 फेब्रवारीपासून जोरात सुरुवात झाली. या विशेष कार्यक्रमात खेळांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी सरकार कशाप्रकारे विविध योजनांद्वारे ऑल्मिपिकमध्ये पदकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे सांगितलं. तसेच क्रीडा संबंधित विषयांवर चर्चा झाली. यावेळेस दिग्गज बॅडमिंटनपटू आणि कोच पुलेला गोपीचंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भारतात क्रिकेटच्या तुलनेत आताही इतर खेळांची स्थिती ही निश्चित चिंताजनक आहे. क्रिकेटला इतकं महत्त्व असताना इतर खेळांना आणि खेळाडूंना कसं प्रोत्साहन मिळेल, याबाबत पुलेला गोपीचंद यांनी आपलं मत मांडलं. गोपिचंद यांच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या सीईओ लतिका खनेजा यांनी आणि जर्मनीच्या बुदंसलीगा फुटबॉल लीगच्या सीसीओ पीयर नॉबेर यांनीही मत मांडलं.
भारतात क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांची प्रगती
“भारतात इतर खेळांसाठी गेली काही वर्ष खऱ्या अर्थाने चांगले राहिले. भारतात गेल्या 10 वर्षांमध्ये इतर खेळांचा चांगला प्रसार आणि प्रचार झाला. याआधी पंतप्रधानांनी खेळांबाबत इतकी चर्चा केली नव्हती. ‘खेलो इंडिया’सारख्या स्पर्धांमुळे देशातील उदयोन्मुख खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना देशासह जगात यशस्वी होण्याचं स्वप्न दाखवलं. तसंच हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं”, असंही पुलेला गोपीचंद म्हणाले.
क्रिकेटवर खापर फोडणं अयोग्य
इतर खेळाडूंच्या स्थितीसाठी क्रिकेटला कारणीभूत ठरवलं जातं. मात्र इतर खेळांचा विकास न होण्यामागे क्रिकेटला कारणीभूत ठरवणं योग्य नसल्याचं लतिका खनेजा यांना वाटतं. क्रिकेटमुळे अनेक खेळाडूंना आणि संबंधितांना संधी मिळाली. त्यामुळे इतर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटवर टीका करणं योग्य नसल्याचंही लतिना खनेजा यांनी स्पष्ट केलं.
तसेच खेलो इंडिया स्पर्धेमुळे खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळाल्याचं पीयर नॉबेर यांनी म्हटलं. “खेलो इंडिया अशी स्पर्धा आहे ज्यामुळे खेळाडू एका टप्प्यापर्यंत जाऊन पोहचतो. युरोपमध्येही अशाच पद्धतींद्वारे खेळांना चालना देण्यात आली आहे. जर्मनीमध्ये फुटबॉलसह इतर खेळांसाठी अशा पद्धती महत्त्वाच्या ठरल्या आहेत. पण त्यासाठी बराच वेळही गेला. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर 7 दशकांच्या मेहनतीनंतर हे होऊ शकलं”, असंही पीयर नॉबेर यांनी नमूद केलं.