भारतीय फुटबॉलला येणार सोनेरी दिवस! जर्मनीचा माजी गोलकीपर ओलिवर कान येणार मुंबईत
भारतात गेल्या काही महिन्यात फुटबॉलची मुळं घट्ट्ं रोवली जात आहेत. फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळी हा जोश पाहायला मिळाला होता. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष भारतीय फुटबॉलकडे लागून आहे. फीफाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात सर्वाधिक व्ह्यूववरशिप भारतातून आली होती. भारतीयांचं फुटबॉलप्रती प्रेम पाहून जर्मनीचा माजी फुटबॉलपटू ओलिवर कान मुंबईत येणार आहे.
मुंबई : भारत हा क्रिकेटवेडा देश आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. पण गेल्या काही वर्षात भारतीयांचा क्रीडाविश्वाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. याची प्रचिती ऑलिम्पिक, एशियन गेम्स या स्पर्धांना मिळालेल्या लोकप्रियतेतून दिसून आली आहे. तसं पाहिलं जगात सर्वात लोकप्रिय खेळ हा फुटबॉल आहे. जगभरात फुटबॉलचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यामुळे फुटबॉलमध्ये भारताचं योगदान असायला हवं असं प्रत्येक आजी माजी फुटबॉलपटूंना वाटतं. यासाठीच गेल्या काही वर्षात भारतीय फुटबॉलवर मेहनत घेतली जात आहे. जर्मनीच्या बायर्न मुनिच क्लबने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र कपचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेतून उत्कृष्ट फुटबॉलपटूंची निवड करण्यात आली होती. आता जर्मनीचा माजी गोलकीपर ओलिवर कान मुंबईत येणार आहे. एक व्हिडीओ जारी करत त्याने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच आपला यामागचा हेतूदेखील स्पष्टपणे सांगितला आहे.
‘नमस्ते, मी भारतात पुन्हा येण्यास उत्सुक आहे. 2008 मध्ये झालेला फेअरवेल मी विसरू शकत नाही. पुन्हा एकदा भारतीय फुटबॉल आणि त्याच्या प्रगतीसाठी भारतात येत आहे. लवकरच आपली भेट होईल.’, असं माजी फुटबॉलपटू ओलिवर कान याने व्हिडीओद्वारे सांगितलं आहे. कानने जर्मनीसाठी एकूण 86 सामने खेळले. त्यापैकी 49 सामन्यात त्याने संघाचं नेतृत्व केलं.
माजी फुटबॉलपटू ओलिवर कान याची 20 वर्षांची प्रदीर्घ फुटबॉल कारकिर्द आहे. 14 वर्षे बायर्न मुनिच क्लबसाठी खेळला. कानला 1999 ते 2002 या काळात सलग चार वेळा युईएफए सर्वोत्कृष्ट युरोपियन गोलकीपर पुरस्कार देखील मिळाला आहे. ओलिवर कान याला पहिल्यांदा 1994 मध्ये आणि त्यानंतर 1997 ते 2002 मध्ये बुंडेस्लिगाचा सर्वोत्कृष्ट गोलकीपर पुरस्कार मिळाला आहे.
जर्मनीला 2002 फिफा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीपर्यत पोहोचवण्यास कानचा मोलाचं योगदान होतं. पण अंतिम फेरीत जर्मनीला ब्राझीलकडून 2-0 ने पराभव सहन करावा लागला. या संपूर्ण स्पर्धेत त्याच्या तावडीतून फक्त तीन गोल गेले. यात अंतिम फेरीच्या दोन गोलचा समावेश होता. स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी त्याला लेव याशिन अवॉर्डने गौरविण्यात आलं होतं.