Vinesh Phogat: “एक फोटो काढला आणि…”, विनेश फोगाट हीचा पीटी उषा यांच्यावर संताप
Vinesh Phogat On P T Usha: माजी महिला पैलवान विनेश फोगाट हीने पीटी उषा यांच्यावर निशाणा साधला आहे. जाणून घ्या विनेशने नक्की काय म्हटलंय?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट हीने शानदार कामगिरी करत रौप्य पदक निश्चित केलं होतं. तर तिला सुवर्ण पदक मिळवण्याची संधी होती. मात्र अंतिम सामन्याआधी विनेशला जास्त वजन असल्याने अपात्र घोषित करण्यात आलं. त्यानंतर विनेशची तब्येत बिघडली. त्यानंतर विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी विनेशची रुग्णालयात जाऊन चौकशी केली होती. तेव्हा पीटी उषा यांनी विनेशसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता या फोटोवरुन वादाला तोंड फुटलं आहे. या फोटोवरुन विनेशने पीटी उषा यांच्यावर आरोप केला आहे.
विनेशला अपात्र ठरवल्यानंतर तिने कुस्तीचा आखाडा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विनेशने काँग्रेसचा हात धरत राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर आता विनेशने पीटी उषा यांनी पोस्ट केलेल्या फोटोवरुन जाहीरपणे सर्वकाही सांगितलंय. पीटी उषा यांच्याकडून कोणत्याच प्रकारे समर्थन न मिळाल्याचं विनेशने म्हटलं. विनेशने एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.
विनेश फोगाटने काय म्हटलं?
“मला नाही माहित की मला काय समर्थन मिळालं. पीटी उषा मॅडम मला भेटायला रुग्णालयात आल्या होत्या. तिथे त्यांनी एक फोटो काढला. जसं तुम्ही म्हणालात, राजकारणात बंद दाराआड खूप काही घडतं. तसंच पॅरिसमध्येही राजकारण झालं. त्यामुळे माझं मन तुटलं. अनेक जण सांगतायत की कुस्ती सोडू नका.मी काय सुरु ठेवायला हवं? प्रत्येक ठिकाणी राजकारण आहे”, असं विनेशने म्हटलं.
फोटो पोस्ट केल्याने नाराजी
विनेशने पीटी उषा यांनी फोटो पोस्ट करत तिच्या पाठीशी असल्याचा दिखावा केल्याचा दावा केलाय. तसं केल्याने विनेशने नाराजी व्यक्त केली. पाठिंबा देण्याची ही योग्य पद्धत नाही, हा केवळ दिखावा असल्याचं विनेशने म्हटलं.
तुम्ही रुग्णालयात खाटेवर आहेत, तु्म्हाला बाहेर जगात काय चाललंय हे माहित नाही. तु्म्ही तुमच्या जीवनातील सर्वात वाईट स्थितीतून जात आहात. अशा वेळेत तुम्ही सर्वांना माझ्यासोबत असल्याचं दाखवण्यासाठी उभ्या आहात. तुम्ही न सांगता फोटो काढला. त्यानंतर फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हणता की आम्ही तुझ्यासोबत आहोत. हे दिखाव्यासारखंच होतं”, असं विनेशने म्हटलं.