भारतीय फुटबॉल ट्रॅकवर आणण्यासाठी जर्मनीच्या ओलिवर कानचे प्रयत्न सुरु
फिफा वर्ल्डकप 2026 साठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. वर्ल्डकपचं 23 वं पर्व कॅनडा, मॅक्सिको आणि युएसएमध्ये होणार आहे. यासाठी 16 मैदान सज्ज होत आहे. दुसरीकडे, भारतीय संघ या विश्वचषकात पात्र होईल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. पण भारतीय फुटबॉलसाठी आतापासून प्रयत्न सुरु झाले आहेत.
मुंबई : भारतात क्रिकेटप्रमाणे फुटबॉलचे कोट्यवधी चाहते आहेत. पश्चिम बंगाल, केरळ आणि गोव्यात फुटबॉलला मोठी पसंती मिळते. फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेवेळी तर क्रीडा चाहत्यांचा उत्साह पाहायला मिळाला होता. त्यामुळे इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देश फुटबॉलसाठी पात्र होत नाही असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडतो. फिफा वर्ल्डकप 2026 साठी भारताने आतापासूनच तयारी सुरु झाली आहे. पहिल्यांदाच हा वर्ल्डकप तीन वेगवेगळ्या देशांमध्ये होणार आहे. तर 48 देश या वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसतील. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेसाठी पात्र होईल का? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फिफा रँकिंगमध्ये टीम इंडिया 102 व्या स्थानावर आहे. त्यामुळे टीम इंडियाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे, भारतात भविष्यातील फुटबॉलपटू घडवण्यासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु आहे. जर्मनीचा माजी स्टार गोलकीपर ओलिवर कान यासाठी मेहनत घेत आहे. मुंबईत काही खेळाडूंना ओलिवर कान खास टीप्स देणार आहे. त्यामुळे खेळाडूंना भविष्यात नक्कीच फायदा होईल.
ओलिवर कान मुंबईत 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता नवोदीत फुटबॉलपटूंशी संवाद साधणार आहे. यामुळे फुटबॉलपटूंना भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाच्या टीप्स मिळणार आहेत. ओलिवर कानचा अनुभव फुटबॉलपटूंच्या कामी येणार आहे. यावेळी ‘आय नेव्हर गिव्ह अप’ प्रेरणादायक भाषण देखील श्रोत्यांना ऐकायला मिळेल. भारतातओलिवर कान पहिल्यांदाच फुटबॉलच्या संधी, आव्हानं आणि शक्यता यावर चर्चा करेल.
माजी फुटबॉलपटू ओलिवर कान याची 20 वर्षांची फुटबॉल कारकिर्द आहे. तसेच या कालावधीदरम्यान तो 14 वर्षे बायर्न मुनिच क्लबसाठी खेळला. दुसरीकडे जर्मनीला 2002 मध्ये फिफा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात ओलिवर कानचं महत्त्वाचं योगदान होतं. पण अंतिम फेरीत ब्राझीलकडून 2-0 ने पराभव सहन करावा लागला. कानने जर्मनीसाठी एकूण 86 सामने खेळले. त्यापैकी 49 सामन्यात त्याने संघाचं नेतृत्व केलं.