Vinesh Phogat : विनेश फोगाटच्या विजयानंतर बजरंग पुनियाची पोस्ट, काय म्हणाला?
Haryana Election 2024 Vinesh Phogat Election Result: विनेश फोगाट हीचा जुलाना विधानसभा मतदारसंघातून विजय झालाय. तिने भाजप उमेदवाराचा पराभव केलाय विनेशच्या विजयानंतर बजरंग पुनियाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने पहिल्याच झटक्यात विजय मिळवला आहे. विनेशने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे. विनेशने जुलाना विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विनेश मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडीवर होती. विनेशने हीच आघाडी शेवटपर्यंत कायम राखत विजय मिळवला.
विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाढीव वजनामुळे हक्काच्या पदकाला मुकावं लागलं होतं. त्यानंतर विनेशने कुस्तीला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विनेशला पक्षप्रवेशाच्या काही तासातच उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर विनेशने घरच्यांचा विरोध झुगारुन राजकीय आखड्यात उतरण्याचा निर्णय केला. विनेश कडव्या विरोधानंतरही आपल्या निर्णयावर ठाम राहिली. विनेशवर पक्षानंतर मतदारांनी विश्वास दाखवला आणि तिला आमदार म्हणून निवडून दिलंय.
विनेशच्या निवडणूक लढवण्याला तिचे गुरु, कोच आणि काका अशा तिहेरी भूमिका बजावणाऱ्या महावीर फोगाट यांचा टोकाचा विरोध होता. मात्र त्यानंतरही विनेशने हा विरोध झुगारला आणि निवडणूक लढवली आणि जिंकलीही. आता कुस्तीच्या आखाड्यात लढणारी विनेश विधानसभेत जनतेचा समस्या मांडताना दिसणार आहे. विनेशचा 6 हजार 15 मतांनी विजय झाला आहे. विनेशला एकूण 65 हजार 80 मतं मिळाली. तर भाजपच्या योगेश बैरागी यांना 59 हजार 65 मतं मिळाली. विनेशच्या विजयानंतर तिचं विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. विनेशच्या या विजयानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही प्रतिक्रिया दिली आहे.
विनेशचा विजय बजरंगची पोस्ट
देश की बेटी विनेश फोगाट को जीत की बहुत बहुत बधाई।
यह लड़ाई सिर्फ़ एक जुलाना सीट की नहीं थी, सिर्फ़ 3-4 और प्रत्याशियों के साथ नहीं थी, सिर्फ़ पार्टियों की लड़ाई नहीं थी।
यह लड़ाई देश की सबसे मज़बूत दमनकारी शक्तियों के ख़िलाफ़ थी। और विनेश इसमें विजेता रही।#VineshPhogat… pic.twitter.com/dGR5m2K2ao
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) October 8, 2024
बजरंगने विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यापासून ते पक्षप्रवेशापर्यंत प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. त्यानंतर बजरंगने विनेशच्या या विजयानंतर फक्त अभिनंदनच केलं नाही तर खूप काही बोलून गेलाय. बजरंगने एक्स या सोशल मीडियावरुन पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बजरंगच्या पोस्टमध्ये काय?
“देशाची मुलगी विनेश फोगाट हीचं विजयासाठी फार फार अभिनंदन. हा लढा फक्त जुलाना मतदारसंघापुरता नव्हता, 3-4 उमेदवारांविरोधात नव्हता, तसेच फक्त पक्षांविरोधातही नव्हता. हा लढा देशातील सर्वात बलाढ्य जुलमी शक्तींविरुद्ध होता आणि विनेश यात विजेती ठरली”, असं बजरंगने म्हटलंय.