Tokyo 2020 Olympics: भारताची ऐतिहासिक कामगिरी, हॉकी टीमकडून 41 वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात, नीरजमुळे ऑलिम्पिक अविस्मरणीय, असा होता प्रवास
Tokyo Olympics 2020 India Medals: ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत एकूण 35 पदकं जिंकली आहेत. भारताने ऑलिम्पिकच्या प्रवासातील सर्वोत्तम कामगिरी ही टोक्यो ऑलिम्पिकमध्ये केली. तेव्हा भारताने तब्बल 7 मेडल्स जिंकले होते.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपनंतर साऱ्या क्रीडा विश्वाचं लक्ष हे ऑलिम्पिक 2024 स्पर्धेकडे लागून आहे. ऑलिम्पिक या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन हे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे करण्यात आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. साऱ्या क्रीडा विश्वाचं लक्ष या स्पर्धेकडे लागून आहे. टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने एकूण 7 मेडल्स जिंकले. भारताची ही ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. भारताने या 7 पदकांसह लंडन ऑलिम्पिकमधील 6 मेडल्सचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.
दणक्यात सुरुवात
ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्यासह मेडल मिळवावं, हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. भारताकडून 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 126 खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 71 पुरुष आणि 55 महिला खेळाडू होत्या. भारत मेडल जिंकणार, असा विश्वास प्रत्येक देशवासियाला होता. मात्र भारत स्पर्धेतील पहिल्याच दिवशी धमाका करेल, याची अपेक्षा नव्हती. भारताने पहिल्याच दिवशी इतिहास रचला. मीराबाई चानू हीने पहिल्याच दवशी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवलं. भारताची ऑलिम्पिक स्पर्धेतील इतिहासातील पहिल्याच दिवशी मेडल पटकावण्याची ही पहिलीच वेळ होती.
लवलीना बोरगोहेन-पीव्ही सिंधूची कामगिरी
मीराबाई चानूने भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. भारतीय खेळाडूंनी हेच सातत्य कायम ठेवलं. भारताला दुसरं मेडल हे बॉक्सिंगमध्ये मिळालं. लवलीना बोरगोहेन हीने भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. त्यानंतर बॅडमिंटन प्लेअर पीव्ही सिंधू हीची पाळी होती. सिंधूनेही कांस्य पदक मिळवलं. सिंधू यासह ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल्स जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. त्याआधी अशी कामगिरी कुस्तीपटू सुशील कुमार याने केली होती.
भारतीय महिला खेळाडूंनंतर पुरुषांनीही दम दाखवला. कुस्ती या मातीतल्या खेळात भारताला 2 पदकं मिळाली. रवी कुमार दहीया आणि बजरंग पुनिया या दोघांनी अनुक्रमे सिलव्हर आणि ब्राँझ मेडल पटकावलं.
4 दशकांच्या प्रतिक्षेला ब्रेक
हॉकी टीम इंडियाने भारतीय चाहत्यांची तब्बल 41 वर्षांची प्रतिक्षा संपवली. हॉकी टीमने कांस्य पदक मिळवलं. टीम इंडियाने जर्मनीला अटीतटीच्या सामन्यात 5-4 ने पराभूत केलं. टीम इंडियाने अखेरीस हॉकीमध्ये 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.
ऐतिहासिक शेवट
टीम इंडियाची टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुरुवात झाली, त्यापेक्षा कित्येक पट शेवट हा ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरला. नीरज च्रोपा याने 87.58 मीटर दूर भालाफेकत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिला. नीरजला मिळाल्या पदकामुळे टीम इंडियाच्या खात्यातील मेडल्सची संख्या ही 7 इतकी झाली. टीम इंडियाने यासह लंडन ऑलिम्पिकमधील 6 पदकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. आता भारतीय चाहत्यांना पॅरिसमध्ये टोक्यो ऑलिम्पिकचा रेकॉर्ड ब्रेक होण्याची प्रतिक्षा आहे.