Explainer : टीम इंडियाला फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळण्याची किती संधी? समजून घ्या पात्रता फेरीचं गणित
भारतात क्रिकेट खेळाला जितकं महत्त्व आहे. तितका इतर खेळांना भाव नसल्याचं वारंवार अधोरेखित झालं आहे. त्यामुळे भारताला क्रिकेट वेडा देश म्हंटलं जातं. असं असलं तरी आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाची कामगिरी हवी तशी नाही, हे देखील वास्तव आहे. त्यामुळे भारत क्रिकेट व्यतिरिक्त फुटबॉलमध्ये नवी उंची गाठणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी पात्र ठरणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.
मुंबई : फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेत एकूण 48 संघ पात्र ठरणार आहेत. म्हणजेच 48 संघांमध्ये फिफा वर्ल्डकपसाठी चुरस होणार आहे. 48 संघात स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीच्या वेगवेगळ्या गटांमध्ये लढती सुरु झाल्या आहेत. पात्रता फेरीसाठी एकूण 210 देशांमध्ये चुरस आहे. या देशांची सहा गटात वर्गवारी करण्यात आली आहे. आशियाई फुटबॉल फेडरेशन 46 संघ होते त्यापैकी 10 संघ बाद झाले असून 36 संघामध्ये चुरस निर्माण झाली. यातून 8 संघांची फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेसाठी लढत होत आहे. तर एका संघाला प्लेऑफ संघातून संधी मिळण्याची शक्यता आहे. एकूण 36 संघांमध्ये भारताचा समावेश आहे. 36 संघांची 9 गटात वर्गवारी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात चार संघ असून टॉप 2 संघांना पुढील फेरीत स्थान मिळणार आहे. प्रत्येक संघाला एक सामना घरच्या मैदानावर, तर एक सामना प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळायचा आहे.
टीम इंडिया आतापर्यंत किती सामने खेळली?
गट अ मध्ये भारत, कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. भारताने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारतीय संघाने कुवैतला त्यांच्या देशात जाऊन 1-0 ने पराभूत केलं. तर कतारकडून घरच्या मैदान अर्थात भुवनेश्वरमध्ये सपाटून मार घावा लागला. कतारने भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यामुळे गुणतालिकेत टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. त्यामुळे उर्वरित 4 सामन्यात टीम इंडियाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
आता टीम इंडियाचं पुढचं गणित नेमकं कसं?
टॉप दोन संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियाला काहीही करून अफगाणिस्तानला घरच्या आणि त्यांच्या मैदानात पराभूत करावं लागेल. कतार 3-0 ने पराभव झाल्याने गोलची भरपाई अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात करावी लागेल. दुसरीकडे, कुवैतला उर्वरित एका सामन्यात पराभूत केल्यास टॉप दोनमध्ये स्थान पक्कं होईल. पण उर्वरित सामन्यातील गणित फिस्कटलं तर फिफा 2026 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न स्वप्नच राहील. त्यामुळे पुढचे चार सामने भारतासाठी किती महत्त्वाचे आहेत, याचा अंदाज येतो.
भारताचे वर्ल्डकप पात्रतेसाठी पुढील सामने
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 21 मार्च 2024
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 26 मार्च 2024
- भारत विरुद्ध कुवैत, 6 जून 2024
- भारत विरुद्ध कतार, 11 जून 2024
भारताने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पात्र व्हावं यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आजी माजी खेळाडू प्रयत्न करताना दिसत आहे. जर्मनीच्या बायर्न म्युनिच क्लबने यासाठी आपलं लक्ष्य केंद्रीत केलं आहे. काही दिवसांपासून जर्मनीचा माजी फुटबॉलटू ऑलिवर कान या देखील भारतात ठाण मांडून आहे. भारताला फुटबॉल बघणारा देशाऐवजी फुटबॉल खेळणारा देश करायचं आहे, अशी प्रतिज्ञाच कानने घेतली आहे. यासाठी देशातील विविध भागात प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा त्याचा मानस आहे.
भारतीय फुटबॉल संघ : सुनील छेत्री (कर्णधार), गुरप्रीत सिंग संधू (गोलकीपर), राहुल भेके, संदेश झिंगन, आकाश मिश्रा, सुरेश सिंग, मनविर सिंग, ललेंगमाविया, सहल अब्दुल समद, महेश नौरेम, निखिल पूजारी, विशाल कैथ (गोलकीपर), अमरिंदर सिंग (गोलकीपर), सुभाषिश बोस, लालचुंगनुंगा, अमिरूद थापा, लिस्टन कोलाको, उडांता सिंग, रोशन सिंग, लल्लियान्झुएला छागंटे, रोहित कुमार, मेहताब सिंग, राहुल केपी.