IND vs PAK : हॉकी टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन, पाकिस्तानचा फायनलमध्ये 5-3 ने धुव्वा
Mens Junior Hockey Championship : मेन्स हॉकी टीम इंडियाने ओमानमध्ये झालेल्या ज्युनिअर आशिया कप 2024 फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5-3 ने लोळवलं. टीम इंडियाने यासह ज्युनिअर आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची हॅटट्रिक पूर्ण केली.
क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. हॉकी टीम इंडियाने धमाका केला आहे. मेन्स हॉकी टीम इंडियाने ज्युनियर आशिया कप ट्रॉफीवर सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा नाव कोरलं आहे. टीम इंडियाने ओमानमधील मस्कट येथे झालेल्या सामन्यात महाअंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत ट्रॉफी उंचावली आहे. गतविजेत्या टीम इंडिया यासह या स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील सर्व सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. थोडक्यात सांगायचं झालं तर टीम इंडियाने खेळलेले सर्व सामने जिंकले. हॉकी टीम इंडियावर या विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. हॉकी टीम इंडियाने याआधी 2004, 2008, 2015 आणि 2023 साली ही ट्रॉफी जिंकली होती.
आक्रमक सुरुवात
टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी महाअंतिम सामन्यात आक्रमक सुरुवात केली. पाकिस्तानने सुरुवातीलाच गोल करत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र टीम इंडियाने चौथ्याच मिनिटाला गोल करत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडियासाठी अर्जीत सिंह हुंदस याने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला. ज्यामुळे पहिलं सत्र बरोबरीत सुटलं.
टीम इंडियाने दुसऱ्या सत्रात शानदार सुरुवात केली. अर्जीत सिंह याने 18 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून गोल केला. टीम इंडियाने यासह 2-1 ने आघाडी घेतली. त्यानंतर इंडियाची 19 व्या मिनिटाला 3-1 अशी आघाडी झाली. दिलराज सिंह याने अप्रतिम फिल्ड गोल्ड केला. मात्र पाकिस्तानने दुसऱ्या सत्राचा खेळ संपता-संपता कमबॅक केलं आणि हाफ टाईमआधी पेन्लटी कॉर्नरद्वारे गोल केलं. मात्र त्यानंतरही पाकिस्तान 2-3 ने पिछाडीवरच होती.
तिसरं सत्र
पाकिस्तानने तिसर्या सत्रात पहिला गोल केला. पाकिस्तानने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला आणि सामन्यात 3-3 ने बरोबरी साधली. तिसऱ्या सत्रातील हा एकमेव गोल ठरला. त्यामुळे आता चौथ्या आणि अंतिम सत्रात चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार होती. तसेच कोण जिंकणार? याबाबतची धाकधुक वाढली होती. चौथ्या आणि शेवटच्या सत्रातील सुरुवातीला अर्जीत सिंह हुंदल याने गोल करत 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर टीम इंडियाने आणखी एक गोल करत 5-3 अशी एकतर्फी आघाडी मिळवली. टीम इंडियाने अशाप्रकारे पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
चक दे इंडिया
The Reign Continues 🏆🇮🇳
Team India are the Men’s Junior Asia Cup 2024 Champions, defending their title in style with a thrilling 5-3 victory over Pakistan! 🔥✨
From hard work to heroics, our young stars have once again shown the world why India is a powerhouse in hockey!… pic.twitter.com/bdvfRL090B
— Hockey India (@TheHockeyIndia) December 4, 2024
आशिया कप 2024 स्पर्धेतील कामगिरी
दरम्यान टीम इंडियाने ज्युनियर मेन्स आशिया कप 2024 स्पर्धेत पहिल्या सामन्यात थायलँडचा 11-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर जपानला 3-2 आणि चीन ताईपेवर 16-0 अशा एकतर्फी फरकाने मात केली. कोरियावर 8-1 ने विजय मिळवला. तर उपांत्य फेरीत मलेशियावर 3-1 ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर आता पाकिस्तानला 5-3 ने लोळवत ट्रॉफी उंचावली.