साक्षी मलिकची विनेश-बजरंगच्या काँग्रेस प्रवेशावर प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाली….
Sakshi Malik On Vinesh Phogat And Bajrang Punia Congress: साक्षी मलिक हीने विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाच्या काँग्रेस पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय पैलवान बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या दोघांनी नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे दोघे कुस्तीचा आखाडा सोडल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीसा अवघे काही दिवस बाकी असताना या दोघांनी पक्षप्रवेश केला आहे.त्यामुळे दोघेही आमदारकीची निवडणूक लढणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. दोघांच्या राजकीय पक्षप्रवेशामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे. दोघांच्या पक्षप्रवेशावरुन आता ऑलिम्पिक मेडलविजेती पैलवान साक्षी मलिक हीने प्रतिक्रिया दिली आहे.
साक्षी मलिक काय म्हणाली?
“त्यांनी राजीनामा दिला आहे आणि पक्षासह जोडले जाणार आहेत. तो त्यांच्या वैयक्तिक निर्णय आहे. मला वाटतं ही आपल्याला सोडून द्यायला हवं. आमच्या आंदोलनाला चुकीची दिशा दिली जाऊ नये. मी महिलांसाठी खंबीरपणे उभी राहणार. मला ही पक्षप्रवेशासाठी ऑफर होती, पण मी कुस्ती आणि महिलांसह उभी आहे”, अशी प्रतिक्रिया साक्षी मलिक हीने दोघांच्या पक्षप्रवेशाआधी दिली.
विनेश, बजरंग, साक्षी आणि अनेक पैलवान काही महिन्यांआधी तत्कालिन भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. महिला पैलवानांवर बृजभूषण यांनी अत्याचार आणि अन्याय केल्याचा आरोप करत कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं. त्यात विनेश, बजरंग, साक्षी आणि अनेक पैलवान आघाडीवर होते. मात्र आता विनेश बजरंगने पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे साक्षी कुठेतरी एकटी पडली आहे.
रेल्वेतील नोकरीचा राजीनामा
विनेश फोगाट हीने काँग्रेस पक्षप्रवेश करण्याआधी रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला. विनेशने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली. रेल्वे सेवा करणं हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा अभिमानाचा काळ होता, असं विनेशने म्हटलं.
विनेशकडून सर्वांचे आभार
“मी कायमच रेल्वेतील कुटुंबियांची (सहकाऱ्यांची) आभारी राहीन. मी जीवनातील या टप्प्यावर रेल्वेतील नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझा राजीनामा हा रेल्वे अधिकाऱ्यांना दिला आहे. मला रेल्वेच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी दिली यासाटी मी भारतीय रेल्वेची ऋणी राहिन”, असं विनेशने म्हटलं.