Sports Awards 2024 : मनु भाकर-डी गुकेशसह एकूण चौघांना खेळरत्न, 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर, पाहा यादी
National Sports Awards 2024 List : क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 जाहीर केले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात विजेत्यांचा सत्कार करतील. मनू भाकर आणि डी गुकेश यांच्यासह चार खेळाडूंना खेळरत्न देण्यात येणार आहे.
भारतीय क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. खेळरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतासाठी विविध क्रीडा प्रकारात 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 मेडल मिळवून देणाऱ्या मनु भाकर यासह एकूण चौघांना यंदाचा खेळरत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award 2024) जाहीर करण्यात आला आहे. तसेच एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
चौघांना खेळरत्न
डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिकपटू प्रवीण कुमार या चौघांना खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याच्यासह एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे.
डी गुकेश
डी गुकेश 12 डिसेंबर 2024 रोजी महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट करत वर्ल्ड चॅम्पियन ठरला. डी गुकेश याने डिंग लिरेन याचा 7.5-6.5 अशा फरकाने पराभव केला होता. डी गुकेशने यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला.
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदकं
भारतीय महिला नेमबाजपटू मनु भाकर हीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला होता. मनुने भारताला एकाच स्पर्धेत 2 पदकं मिळवून दिली होती. मनुने सिंगल आणि मिक्स डबल या दोन्ही प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं.
‘सरपंच’ हरमनप्रीत सिंह
हॉकी टीम इंडियाने कॅप्टन हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात ऑलिम्पिकमध्ये सलग दुसर्यांदा मेडल मिळवलं होतं. हरमनला या कामगिरीसाठी खेळरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.
प्रवीण कुमार
पॅरा हाय जंपर प्रवीण कुमार याने पॅरालिम्पिकमध्ये टी 64 वर्गात सुवर्ण कामगिरी केली. गुडघ्यापासून खाली एक किंवा दोन्ही पाय नसलेल्या खेळाडूंचा समावेश या टी 64 वर्गात केला जातो. या श्रेणीतील खेळाडू धावण्यासााठी कृत्रिम पायाचा वापर करतात.
कुणाला कोणता पुरस्कार? पाहा यादी
➡️ @YASMinistry announces #NationalSportsAwards 2024
➡️ President of India to give away Awards on 17th January 2025
➡️ ‘Major Dhyan Chand Khel Ratna Award’ is given for the spectacular and most outstanding performance in the field of sports by a sportsperson over the period of… pic.twitter.com/nRY3nsleOY
— PIB India (@PIB_India) January 2, 2025
पुरस्कारातून क्रिकेट ‘आऊट’
केंद्र सरकारकडून यंदाच्या पुरस्कारासाठी एकही क्रिकेटपटूची निवड करण्यात आलेली नाही. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप तर 2011 नंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघातील निवडक खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र तसं काहीच झालेलं नसल्याने क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.