Aman Sehrawat Promotion : अमन सेहरावतसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून मोठ्या पदावर नियुक्ती, इतक्या लाखांनी वाढला पगार
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयात पदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतसाठी आनंदाची बातमी आहे. अमन याला उत्तर रेल्वेकडून पदोन्नती मिळाली असून त्याच्या पगारातही भरघोस वाढ झाली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमन सेहरावत हा ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयात पदक जिंकणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला होता. वयाच्या 21 व्या वर्षी 57 किलो वजनी गटामध्ये फ्री स्टाईल प्रकारामध्ये त्याने कांस्यपदक जिंकलं होतं. रेल्वेमध्ये कामाला असलेल्या अमन सेहरावत याला पदोन्नती मिळाली आहे.
अमन सेहरावत याची विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमोशनसोबतच त्याच्या पगारातही वाढ झालीये. उत्तर रेल्वेचे मुख्य अधिकारी श्री सुजित कुमार मिश्रा यांनी अमन सेहरावत याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याबद्दल त्याला पदोन्नती दिली असून त्याची OSD म्हणून नियुक्ती केल्याचं उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एस उपाध्याय यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
भारतासाठी सहावे पदक अमन सेहरावत याने जिंकले होते. सेमी फायनलमध्ये प्रवेश केल्यावर अमन याच्याकडून देशवासियांना अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र सेमी फायनलमध्ये त्याचा पराभव झाला. त्यामुळे सर्वांचाच हिरमोड झाला आणि पदकाची आशाही सोडली. मात्र पठ्ठ्याने हार मानली नाही आणि कांस्यपदक जिंकले. भारतीय रेल्वेमध्ये TTE चा पूर्ण वर्षाचा पगार 2.42 लाख रुपयांपर्यंत असतो. आता OSD म्हणजेच विशेष कर्तव्य अधिकारी 4.17 लाख रूपये मिळतील. आता त्याच्या पगारामध्ये 1.75 लाखांनी वाढ होणार आहे.
अमन सेहरावत हा छत्रसाल आखाड्यातील पैलवान होता आणि भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला एकटाच पुरूष पैलवान होता. अमन यानेही कुस्तीमध्ये पदक जिंकण्याची आपली परंपरा कायम ठेवली. गेल्या 16 वर्षांपासून ऑलम्पिकमध्ये कुस्तीत पदक जिंकलेलं आहे. यंदाही 21 वर्षांच्या अमनने ही जबाबदारी सांभाळली.
खाशाबा जाधव-कांस्य, 1952 हेल्सिंकी, सुशील कुमार-कांस्य, 2008 बीजिंग, सुशील कुमार-रौप्य, 2012 लंडन, योगेश्वर दत्त-कांस्य, 2012 लंडन, साक्षी मलिक-कांस्य, 2016 रियो, रवी दहिया-रौप्य, 2020 टोक्यो, बजरंग पूनिया-कांस्य, 2020 टोकियो आणि अमन सेहरावत-कांस्य, 2024 पॅरिस