ऑलिम्पिक स्पर्धेचा 11 वा दिवस भारतासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी घेऊन आला आहे. भारताची पदकाची गाडी तीनवरच अडकली होती. आता भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. 50 किलो वजनी गटात विनेशने ही कामगिरी केली आहे . यामुळे भारताच्या पारड्यात आणखी एक पदक पडणार हे निश्चित झालं आहे. विनेश फोगाटने उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस लोपेजला लोळवलं आणि अंतिम फेरी गाठली आहे. यासह विनेश फोगाटने इतिहासाची नोंद केली आहे. विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आता मात्र भारताला विनेशकडून सुवर्ण पदकाची आशा असणार आहे. भारतासाठी साक्षी मलिक हीने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.
विनेशने क्युबाच्या लोपेजला 5-0 अशी मात दिली. या सामन्यातील पहिली फेरी खुपच अतितटीची झाली. त्यामुळे कोण आघाडी घेणार अशी स्थिती होती. अखेर विनेशने 1-0 ने आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने 2-2 गुणांची आघाडी घेत 5-0 अशी स्थिती आणली. या स्थितीत क्युबाच्या कुस्तीपटूला कमबॅक करता आलं नाही. विनेशने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. विनेश ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली.
विनेशला सुवर्ण की रजत पदक मिळणार याचा निर्णय 7 ऑगस्टला होणार आहे. विनेश फोगाटने 2016 रियो डि जेनेरो ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं होत. तेव्हा दुखापत झाल्याने स्पर्धेबाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वीच मात खावी लागली होती. पण यावेळेस उपांत्य फेरी गाठत अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.
विनेशने अंतिम 16 सामन्यात मोठा उलटफेर केला होता. जागतिक क्रमवारीत एक नंबर असलेल्या युई सुसाकी हिला 3-2 ने मात दिली होती. तेव्हाच फोगाट या स्पर्धेत कमाल करणार हे निश्चित झालं होतं. युईने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्यानंतर विनेशने युक्रेनच्या लिवाचचा 7-5 अशा फरकाने धुव्वा उडवत सेमी फायलनचं तिकीट मिळवलं होतं.
पाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं कुस्तीत हे सातवं मेडल आहे. यापूर्वी 2008 मध्ये सुशील कुमारने कांस्य, 2012 सुशील कुमारने रजत आणि योगेश्वर दत्तने कांस्य पदक मिळवलं होतं. 2016 मध्ये साक्षी मलिकने कांस्य, 2020 मध्ये बजरंग पुनियाने कांस्य आणि रवि दहियाने रजत पदक मिळवलं होतं.