Manu Bhaker : ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकर हीचा मोठा निर्णय, नक्की काय?
Paris Olympics Medal Winner Manu Bhaker: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सलग 2 कांस्य पदक मिळवून देणाऱ्या भारतीय महिली नेमबाज मनु भाकर हीने मोठा निर्णय घेतला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत महिला नेमबाज मनू भाकर हीने ऐतिहासिक कामगिरी केली. मनू भाकर हीने भारताला 2 पदक मिळवून दिली. मनू भाकर ऑलिम्पिक स्पर्धेच्या निरोप समारंभात भारताची ध्वजवाहकही होती. या दरम्यान मनू भाकर आणि भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा या दोघांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मनूची आई आणि नीरज या दोघांचाही एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हीडिओत मनूची आई नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवल्याचं दिसत आहे. या सर्व प्रकारानंतर नेटकऱ्यांनी मनू आण नीरजमध्ये काही तर सुरु असल्याचा अंदाज बांधला. काहींनी तर त्यांचं लग्नच ठरवून टाकलं. या सर्व चर्चांदरम्यान मनू भाकर हीने मोठा निर्णय घेतला आहे.
मीडियो रिपोर्ट्सनुसार, मनू भाकर 3 महिन्यांच्या विश्रांतीवर जात असल्याचं समजत आहे. मनुला या विश्रांतीमुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागू शकतं. मनूने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेनंतर विश्रांतीचा निर्णय केला आहे. तसेच दिल्लीत ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या शूटिंग वर्ल्ड कपमध्ये ती खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. याबाबतची माहिती मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी दिली. “मनू दिल्लीत ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या शूटिंग वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही हे मला माहित नाही कारण ती 3 महिन्यांसाठी ब्रेक घेत आहे. ती गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सराव करत आहे. त्यामुळे ती विश्रांती घेतेय”, असं राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मनू भाकरचं ‘मिशन गोल्ड’
शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे. त्यामुळे मनूचं पुढील लक्ष्य काय असणार? असा प्रश्न भारतीय चाहत्यांना आहे. या प्रश्नाचं उत्तर राणा यांनी दिली. आशियाई गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवणं हे मनूचं पुढील लक्ष्य असल्याचं राणा यांनी सांगितलं. मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकल्याने आता तिच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
पहिलीच भारतीय महिला
मनु भाकर हीने भारताला पिस्तूल इव्हेंटमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलंवहिलं आणि कांस्य पदक मिळवून दिलं. त्यानंतर पिस्तूल इव्हेंटमधील मिश्र दुहेरी प्रकारात सरबज्योत सिंह याच्यासह मनू भाकर हीने ब्रॉन्झ मेडल पटकावलं. मनू यासह एका ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिली ठरली.