पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी खळबळ, ऑस्ट्रेलियन महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज झाले आहेत. जेतेपदाची आस घेऊन खेळाडू कठोर परिश्रम करत आहेत. मात्र या स्पर्धेपूर्वी घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाचं वातावरण आहे. ऑस्ट्रेलियन महिलेसोबत नको ते घडलं आणि सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 200 हून अधिक देशांचे खेळाडू पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. स्पर्धेसाठी खेळाडूंचा कसून सराव सुरु आहे. गेल्या चार वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आहे. 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. स्पर्धेसाठी फ्रान्स सरकार आणि ऑलिम्पिक समितीने जोरदार तयारी केली आहे. पण या स्पर्धेपूर्वी घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाचं वातावरण पसरलं आहे. इतकंच काय तर क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. पॅरिसमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. महिलेवर अर्ध्या रात्री काही जणांनी हल्ला आणि तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 20 जुलैला घडल्याचं सांगण्यात आहे. या प्रकरणी फ्रान्सच्या तपास यंत्रणा तातडीने आरोपींचा शोधात गुंतल्या आहेत. पाच जणांनी अत्याचार केल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. रिपोर्टनुसार, सदर महिलेने एका दुकानात आश्रय घेऊन स्वत:चा जीव वाचवला.
धक्कादायक घटनेनंतर पॅरिसच्या महापौरांनी खेळाडूंना रात्री एकटं बाहेर पडू नका, असा सल्ला दिला आहे. तसेच संघाचा ड्रेस परिधान करू नये असंही सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिकच्या काही दिवसाआधी पॅरिसमध्ये एका ऑस्ट्रेलियन महिलेसोबत पाच जणांनी अत्याचार केला. पीडित महिलेने यावेळी कबाबच्या दुकानात आश्रय घेतला आणि जीव वाचवला. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे.
फ्रेंच मीडियानुसार, सीसीटीव्हीत सदर महिला पळताना दिसत आहे. फाटलेल्या कपड्यांसह महिला दुकानातील कर्मचाऱ्यांकडे मदत मागत होती. सदर महिला दुकानात गेल्यानंतर एक व्यक्ती तिचा पाठलाग करत दुकानात आला. तसेच काही ऑर्डर करण्यापूर्वी महिलेच्या पाठीवर हात मारताना दिसत आहे. यावेळी घाबरलेली महिला सदर व्यक्ती आरोपी असल्याचं सांगते. तेव्हा दुकानातील एका कर्मचाऱ्याने आक्रमक पवित्रा घेताच तो पळ काढतो.
माहितीनुसार आरोपीने सदर महिलेचा फोनही चोरी केला आहे. फ्रान्सने पॅरिस ऑलिम्पिकाठी 60 हजार कोटीहून अधिक पैसा खर्च केला आहे. पण इतकं असून सुरक्षेत उणीव दिसून आली आहे. या घटनेनंतर फ्रान्समध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.