Paris Olympics 2024: वयाच्या 11 व्या वर्षी या खेळाडूची स्पर्धेसाठी निवड, स्केटबोर्डिंगमध्ये करणार कमाल
ऑलिम्पिक स्पर्धेत नवे विक्रम रचले जाणार, काही विक्रम मोडले जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोणता खेळाडू काय विक्रम नोंदवतो याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी 11 वर्षाच्या खेळाडूची चर्चा रंगली आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेचं हे 33 वं पर्व असून या पर्वात कोणता देश किती पदकं मिळवतो याची उत्सुकता लागून आहे. गेल्या काही वर्षात ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. भाग घेणाऱ्या देशांनी स्पर्धक घडवण्यासाठी तिजोरीचं दारं खुली केली आहेत. त्यामुळे स्पर्धा अतितटीच्या होताना दिसत आहे. आता चार वर्षांची मेहनत प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वीच काही खेळाडू चर्चेत आले आहेत. यात चीनची स्केटबोर्डर झेंग हाओहाओ ही चर्चेत आली आहे. दक्षिण चीनच्या ग्वांगडोंगमधील रहिवासी आहे.पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत झेंग चीनच्या महिला स्केटबोर्डिंग संघाचा भाग आहे. वयाच्या 11 व्या वर्षी चीनच्या इतिहासातील सर्वात तरुण ऑलिम्पियन बनून तिने आधीच रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. तिने वयाच्या सातव्या वर्षी स्केटबोर्डिंगला सुरुवात केली आणि आता चार वर्षांनंतर ती तिच्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे. बुडापेस्ट आणि शांगाई येथील पात्रता मालिकेत छाप पाडल्यानंतर झेंग पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वात तरुण ऑलिम्पिक चॅम्पियन बनून सर्वकालीन जागतिक विक्रम मोडण्याचे झेंगचे लक्ष्य असेल. सध्या हा विक्रम डेन्मार्कच्या इंगे सोरेनसेनच्या नावावर आहे. तिने 1938 मध्ये वयाच्या 12 वर्षे आणि 24 दिवसांत 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. झेंगने जर पॅरिसमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. तर तिच्या नावावर विक्रमाची नोंद होणार आहे. झेंग 86 वर्ष जुना विक्रम मोडीत काढू शकते.
झेंगने आपल्या खेळाने सर्वांचा प्रभावित केलं. अवघ्या चार वर्षातच तिने स्केटबोर्डमध्ये चमक दाखवली. त्यामुळे चीनच्या राष्ट्रीय खेळांमध्ये ग्वांगडोंगचे प्रतिनिधित्व केले. तिने 2022 मध्ये गुआनडोंग प्रांतीय खेळांमध्ये महिला पार्क स्केटबोर्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि 2023 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आता पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत सुवर्ण कामगिरी करण्याचा मानस आहे. आता या स्पर्धेत ती कशी कामगिरी करते आणि सुवर्णपदक मिळवून विक्रम नोंदवते का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.