Paris Olympics 2024: भारताच्या या पाच नवोदित खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा, कोण आहेत ते जाणून घ्या
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारताकडून 117 खेळाडूंचा चमू ऑलिम्पिक स्पर्धेत पोहोचला आहे. या चमूकडून भारतीय क्रीडारसिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. या चमूतील पाच नवोदित खेळाडू पदक आणतील अशी चर्चाही रंगली आहे. कोण आहेत हे खेळाडू ते जाणून घेऊयात
ऑलिम्पिक स्पर्धेच्या 33व्या पर्वाचं आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आलं आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जगभरातील खेळाडू सज्ज झाले आहेत. भारताकडून 117 खेळाडूंचा चमू पॅरिसमध्ये दाखल झाला आहे. भारतीय चमू मागचे सर्व विक्रम मोडीत काढून पदकांची कमाई करेल अशी आशा आहे. टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे यंदा अपेक्षा वाढल्या आहेत. मागच्या पर्वात भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळे यावेळी पदकांचा दुहेरी आकडा गाठेल अशी आशा आहे. असं असताना पाच नवोदित खेळाडूंकडून यंदा पदाकाची अपेक्षा आहे. या खेळाडूंमध्ये निखत जरीन, सिफ्ट कौर सम्रा, अंतिम पंघाल, धीरज बोम्मादेवरा आणि रीतिका हुड्डा हे पाच खेळाडू आहेत. बॉक्सिंग, शूटिंग, कुस्ती या खेळामध्ये पदक मिळवण्याची अपेक्षा आहे.
निखत जरीन : बॉक्सिंगपटू निखत जरीन पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत उतरणार आहे. तिच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनचा किताब मिळवलेली जरीन बॉक्सिंगमध्ये भारताला पहिलं सूवर्ण पदक मिळवून देणारी बॉक्सिंगपटू ठरू शकते. 52 वजनी गटात असलेल्या निखतने तुर्कीत रंगलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये आणि बर्मिंघममध्ये रंगलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. मागच्या वर्षी तिने 50 किलो वजनी गटात वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावलं होतं. हे तिचं सलग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधलं दुसरं सुवर्ण पदक होतं. निखतने एशियन गेम्समध्ये कांस्य पदक मिळवलं होतं.
सिफ्ट कौर सम्रा : 22 वर्षीय सिफ्ट शूटिंग सेन्सेशनमधून ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण करणार आहे. मागच्या एशियन गेममध्ये तिने 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात 469.6 गुणांसह जागतिक विक्रम मोडीत काढला होता. तसेच सुवर्णपदकाची कमाई केली होती. साम्राने या वर्षाच्या सुरुवातील आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतही कांस्य पदकाची कमाई केली होती.
अंतिम पंघाल : महिला कुस्तीपटू अंतिम पंघालकडून फार अपेक्षा आहेत. तिची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे. मात्र 19 वर्षीय तरुणीने 53 किलो वजनी गटात दोन वेळच्या युरोपियन चॅम्पियन एम्मा जोन डेनिस माल्मग्रेन हीला पराभूत केलं होतं. तसेच कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत तिची जादू दिसेल असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे.
धीरज बोम्मादेवरा : धीरज बोम्मादेवरा प्रतिभावान नेमबाज असून मूळचा आंध्र प्रदेशचा आहे.गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वैयक्तिक रिकर्व्हमध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवणारा पहिला भारतीय होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या रिकर्व्ह वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. बोम्मादेवराने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या रिकर्व्ह संघात रौप्य पदक जिंकले होते आणि आयएसएस विश्वचषक स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली होती.
रीतिका हुड्डा : 22 वर्षीय कुस्तीपटू रीतीका हुडा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 76 वजनी गटात उतरणार आहे. गेल्या वर्षी 76किलोमध्ये कोटा बुक करणारी ती पहिली भारतीय ठरली. अंडर 23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला देखील आहे. रितिकाने ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी असलेल्या बहुतेक कुस्तीपटूंशी स्पर्धा केली आहे. यात फक्त एका स्पर्धकाविरुद्ध विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.