Paris Olympics 2024: हॉकी इंडियाची कांस्य कमाई, स्पेन विरुद्ध 2-1 ने विजय, पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेचा गोड शेवट
Hockey India Clinched Bronze Medal Paris Olympics 2024: हॉकी टीम इंडियाने स्पेन विरुद्ध शानदार विजय मिळवत कांस्य पदक पटकावलं आहे. भारताने यासह पीआर श्रीजेश याला विजयी निरोप दिला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. हॉकी टीम इंडियाने स्पेनला पराभूत करत कांस्य पदकाची कमाई केली आहे. हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात टीम इंडियाने स्पेनवर 2-1 अशा फरकाने मात केली आहे. भारताला यंदाही फायनलमध्ये पोहचण्यात अपयश आलं. मात्र भारताने टोक्योनंतर आता पॅरिसमध्येही सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक कांस्य पदक मिळवलं आहे. भारताने या विजयासह आपल्या मोहिमेचा शानदार शेवट केला आहे. तसेच गोलकीपर पीआर श्रीजेश याला पदकासह निरोप दिला आहे. पीआर श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियावर हॉकी टीमचं अभिनंदन केलं जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी इंडियाचं अभिनंदन केलं आहे.
दोन्ही संघांच्या कर्णधारांकडून गोल
इंडिया आणि स्पेन दोन्ही संघांसाठी त्यांच्या कर्णधारांनीच गोल केले. स्पेनचा कॅप्टन मार्क मिरालेस याने गोल करत आघाडी मिळवून दिली. स्पेनने आघाडी कायम राखून भारतावर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचा कॅप्टन हरमनप्रीत याने झटपट 2 गोल करत भारताला बरोबरी आणि आघाडी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
सामन्याचा धावता आढावा
दोन्ही संघांनी पहिल्या सत्राच चिवट प्रतिकार केला. इंडिया आणि स्पेनने एकमेकांना गोल करण्यापासून रोखलं. त्यामुळे पहिलं सत्र हे 0-0 ने बरोबरीत राहिलं. त्यानंतर सामन्यातील पहिला गोल स्पेनचा कॅप्टन मार्क मिरालेस याने दुसऱ्या सत्रातील 18 व्या मिनिटाला केला. त्यामुळे टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर पडली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने त्यानंतर दणक्यात कमबॅक केलं. भारताकडून कॅप्टन हरमनप्रीतने सलग दुसऱ्या (30 मिनिट) आणि तिसऱ्या सत्रात (33 मिनिट) गोल केले. हरमनप्रीतने पेन्लटी कॉर्नरद्वारे हे गोल केले. टीम इंडियाने अशाप्रकारे 2-1 अशी आघाडी मिळवली. इतकंच नाही तर भारताने तिसऱ्या सत्रानंतर ही आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवलं.
शेवटच्या सत्राचा थरार
स्पेनला विजयासाठी शेवटच्या सत्रात 2 गोल करायचे होते. तर बरोबरी साधण्यासाठी 1 गोल आवश्यक होता. स्पेनने त्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. स्पेनला अखेरच्या सत्रात गोल करण्याची संधी मिळाली. मात्र भारताने आपल्या आघाडीचा अप्रतिम बचाव करत सामना जिंकला.
हॉकी इंडियाला सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक
𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐰𝐢𝐧 𝐬𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬𝐢𝐯𝐞 #𝐇𝐨𝐜𝐤𝐞𝐲 𝐁𝐫𝐨𝐧𝐳𝐞 𝐦𝐞𝐝𝐚𝐥𝐬 𝐚𝐭 𝐭𝐡𝐞 #𝐎𝐥𝐲𝐦𝐩𝐢𝐜𝐬
India defeat Spain 2-1 in the Bronze medal game to clinch the medal#Paris2024 pic.twitter.com/cSkOQabgjZ
— International Hockey Federation (@FIH_Hockey) August 8, 2024
टीम इंडियाची इथवरची कामगिरी कशी?
दरम्यान टीम इंडियाने साखळी फेरीत 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला. भारताने 1 सामना हा गमावला तर एक सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 3-2 फरकाने विजय मिळवला. अर्जेंटीना विरुद्धचा सामना 1-1 ने बरोबरीत राहिला. आयर्लंडवर 2-0 एकतर्फी फरकाने मात केली. चौथ्या सामन्यात बेल्जियमने 1-2 ने पराभूत केलं. त्यानंतर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात कांगारुंना 3-2 ने लोळवलं. त्यानंतर उपांत्य पूर्व फेरीत टीम इंडिया-ग्रेट ब्रिटन सामना 1-1 ने बरोबरीत राहिला. टीम इंडियाने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने जिंकला.
त्यानंतर उपांत्य फेरीत भारतासमोर जर्मनीचं आव्हान होतं. भारताला हा सामना जिंकून रौप्य पदक निश्चित करण्यासह 44 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहचण्याची संधी होती. मात्र जर्मनीने भारताला अटीतटीच्या लढतीत 3-2 ने पराभूत केलं. त्यामुळे भारताचं रौप्य पदकाचं स्वप्न भंगलं. मात्र भारताने कांस्य पदकासह आपल्या पॅरिस ऑलिम्पिकमधील मोहिमेचा शेवट हा गोड केला आहे.