Swapnil Kusale ला कांस्य पदक, कोल्हापूरच्या पठ्ठ्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

| Updated on: Aug 01, 2024 | 2:22 PM

Swapnil Kusale Paris Olympics 2024: भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक मिळालं आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरातला नेमबाज स्वप्निल कुसाळे याने नेमबाजीत कांस्य पदक मिळवून दिलं आहे.

Swapnil Kusale ला कांस्य पदक, कोल्हापूरच्या पठ्ठ्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी
Swapnil Kusale bronze medal india flag paris olympics
Follow us on

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 1 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे. भारतासाठी स्वप्निलने या 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात पदक जिंकणारा एकमेव खेळाडू हा बहुमान मिळवला आहे. स्वप्निलच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. स्वप्निल भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा खाशाबा जाधव यांच्यानंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात एकूण 3 प्रकारे शूटिंग केली जाते. उभं राहून, गुडघ्यावर बसून आणि पोटावर झोपून अशाप्रकारे शूटिंग केली जाते. स्वप्निलने या प्रकारात चमकदार कामगिरी करत आधी कांस्य पदक निश्चित केलं. त्यामुळे स्वप्निलला रौप्य पदकाची संधी होती. मात्र रौप्य पदकाने अवघ्या काही पॉइंट्सने हुलकावणी दिली. मात्र त्यानंतरही स्वप्निलच्या विजयाचा जल्लोष कोल्हापुर ते पॅरिस असा पाहायला मिळत आहे.

स्वप्निलची ऐतिहासिक कामगिरी

72 वर्षांनी महाराष्ट्राची मोहर

कुस्तीपटू खाशाबा जाधव हे भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातील पहिले खेळाडू ठरले होते. त्यांनी 1952 साली ही कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर 72 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतासाठी पदक मिळवून देण्यात अपयश आलं होतं. अनेक वेळा पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र अखेर स्वप्निलने महाराष्ट्राची पदकाची तब्बल 7 दशकांची प्रतिक्षा संपवली आहे.

सोशल मीडियावर एकच जल्लोष

स्वप्निलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजयाचं सीमोल्लंघन केलं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचं कौतुक अभिनंदन केलं जात आहे. कोल्हापुरात ठिकठिकाणी पेढे वाटून आणि फटाके फोडून स्वपनिलच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.