Olympics 2024 Highlights And Update: नीरज चोप्राला सिलव्हर, हॉकीत सलग दुसऱ्यांदा कांस्य, भारताच्या खात्यात पाच पदकं

| Updated on: Aug 09, 2024 | 2:46 AM

Paris Olympics 2024 8 August Updates Highlights In Marathi: भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत नीरज चोप्रा याने भालाफेकीत सलग दुसरं पदक मिळवून दिलं. नीरजने रौप्य पदक मिळवलं. तर हॉकी टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरली.

Olympics 2024 Highlights And Update: नीरज चोप्राला सिलव्हर, हॉकीत सलग दुसऱ्यांदा कांस्य, भारताच्या खात्यात पाच पदकं
neeraj chopra india flag and hockey india
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील 13 वा दिवस ऐतिहासिक ठरला.  हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात हॉकी टीम इंडियाने स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने (9 ऑगस्ट) भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवं आणि पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने ऑलिम्पिकमधील विक्रमी थ्रो करत सुवर्ण पदक मिळवलं. अशाप्रकारे भालाफेकीतील पहिले 2 पदकं ही आशियाला मिळाली. दिवसभरात काय काय घडलं? जाणून घ्या या ब्लॉगमधून.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Aug 2024 02:26 AM (IST)

    भारताला 9 ऑगस्टला सहावं पदक मिळणार? पाहा वेळापत्रक

    ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत नीरज चोप्रा याने भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं. तर हॉकी टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक मिळवण्यात यश मिळवलं.  पैलवान अमन सहरावतला उपांत्य फेरीत विजय मिळवून भारतासाठी रौप्य पदक निश्चित करण्याची संधी होती. मात्र तो पराभूत झाला. मात्र त्यानंतरही अमनला कांस्य पदकाची संधी आहे. अमनचा शुक्रवारी रात्री 11 वाजता कांस्य पदकासाठी सामना होणार आहे.  भारताच्या खात्यात सद्यस्थितीला एकूण 5 पदकं आहेत. त्यामुळे अमनकडून सहाव्या पदकाची आशा आहे. पाहा 9 ऑगस्टचं भारताचां पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील वेळापत्रक.

    भारताचं 9 ऑगस्टचं वेळापत्रक

     

  • 09 Aug 2024 01:25 AM (IST)

    नीरज चोप्राला सिलव्हर तर अर्शद नदीमला सुवर्ण पदक

    पॅरिस ऑलिम्पिक  2024 स्पर्धेत भारताला भालाफेकीत रौप्य पदक मिळालं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने सुवर्ण पदक मिळवलं आहे. अर्शद नदीम याने ऑलिम्पिकमधील 16 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक करत सर्वात लांब थ्रो करण्याचा कारनामा केला आणि गोल्ड मेडल मिळवलं. तर गत स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागंल.

    नीरज चोप्राला सलग दुसरं मेडल

     


  • 09 Aug 2024 01:04 AM (IST)

    पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा पाचव्या प्रयत्नात कडक थ्रो

    पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने पाचव्या प्रयत्नात कडक थ्रो केला आहे. नदीमने 84.87 मीटर थ्रो केला.

  • 09 Aug 2024 01:03 AM (IST)

    नीरज चोप्रा पाचव्या प्रयत्नात अपयशी

    नीरज चोप्रा पाचव्या प्रयत्नात अपयशी ठरला आहे. त्याने अंतिम रेषेच्या बाहेर स्पर्श केल्याने त्याचा थ्रो अवैध ठरवण्यात आला.

  • 09 Aug 2024 12:53 AM (IST)

    अर्शद नदीमचा चौथ्या प्रयत्नात 79.40 मीटर लांब थ्रो

    पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने चौथ्या प्रयत्नात 79.40 मीटर लांब थ्रो केला आहे. तर भारताचा नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नात अपयशी ठरला.

  • 09 Aug 2024 12:51 AM (IST)

    नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नात अपयशी

    नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नात अपयशी ठरला आहे. नीरजचा चौथा थ्रो हा फाऊल ठरला आहे. नीरजने अंतिम रेषेला थ्रो केल्यानंतर स्पर्स केल्याने त्याचा हा प्रयत्न अवैध ठरला आहे.

  • 09 Aug 2024 12:35 AM (IST)

    नीरज चोप्रा तिसऱ्या प्रयत्नात अपयशी, तरीही दुसऱ्या स्थानी

    नीरज चोप्रा तिसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरला आहे. नीरजचा तिसऱ्या फेरीतील थ्रो हा अवैध (फाऊल) ठरला. त्यानंतरही नीरज दुसऱ्या स्थानी आहे.

  • 09 Aug 2024 12:29 AM (IST)

    अर्शद नदीमचा तिसऱ्या प्रयत्नात 88.72 मीटर थ्रो

    पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने तिसऱ्या प्रयत्नात 88.72 मीटर थ्रो केला आहे. अर्शद या थ्रोनंतर फारसा आनंदी दिसला नाही.

  • 09 Aug 2024 12:21 AM (IST)

    नीरजचा दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो

    नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला. त्याने फेकलेला थ्रो हा अवैध (फाऊल) ठरला. मात्र त्यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात कमबॅक करत 89.45 मीटर लांब थ्रो फेकला. नीरजच्या कारकीर्दीतील हा दुसरा सर्वोत्तम थ्रो ठरला.

  • 09 Aug 2024 12:17 AM (IST)

    पाकिस्तानच्या अर्शद नदीम दुसऱ्या प्रयत्नात अव्वल स्थानी

    पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला. अर्शदचा पहिला प्रयत्न हा फाऊल (अवैध) ठरला. मात अर्शदने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर इतका लांब भालाफेकत इतिहास रचला आहे.

  • 09 Aug 2024 12:08 AM (IST)

    नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी

    नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला आहे. नीरजचा पहिला प्रयत्न हा फाऊल ठरला आहे.नीरजला यानंतर आणखी 5 वेळा भाला फेकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नीरजकडून कमबॅकची आशा आहे.

  • 08 Aug 2024 11:57 PM (IST)

    भालाफेकपटू नीरज चोप्राच्या अंतिम सामन्याला सुरुवात

    भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या अंतिम फेरीतील सामन्याला सुरुवात झाली आहे. नीरज चोप्राने या प्रकारात पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारत पहिलं स्थान मिळवलं होतं. त्यानंतर आता नीरजचा अंतिम सामना होत आहे. नीरजकडून टोक्यो ऑलिम्पिकनंतर आता पॅरिसमध्ये सुवर्ण पदकाची आशा आहे.

  • 08 Aug 2024 09:54 PM (IST)

    अमन सेहरावतकडून निराशा, सेमी फायनलमध्ये पराभूत

    भारतीय पैलवान अमन सेहरावत याचा उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. जपानच्या पैलवानाने अमनवर 10-0 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. मात्र या पराभवानंतरही कांस्य पदकाची संधी आहे.

  • 08 Aug 2024 09:27 PM (IST)

    अमन सेहरावतकडून पदकाची आशा, पावणे दहाला सामना

    भारताचा युवा पैलवान अमन सेहरावतसमोर 57 किलो वजनी गटातील अंतीम फेरीत जपानचं आव्हान असणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

  • 08 Aug 2024 08:21 PM (IST)

    भारताचं हॉकीतलं 13 वे ऑलिम्पिक पदक

    ऑलिम्पिकमध्ये स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचं हे एकूण 13 वं तर चौथं कांस्य पदक ठरलं आहे. भारताची ही ऑलिम्पिक स्पर्धेत सलग कांस्य पदक जिंकण्याची दुसरी वेळ ठरली आहे. भारताने पॅरिसआधी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ही कामगिरी केली होती. तर त्याआधी 1968 आणि 1972 मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. तसेच भारताने 8 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकही मिळवलं आहे.

  • 08 Aug 2024 07:28 PM (IST)

    हॉकी टीम इंडियाचा शेवट गोड, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथं आणि कांस्य पदक मिळालं आहे. हॉकी टीम इंडियाने स्पेनवर 2-1 ने मात करत पदक मिळवलं आहे. भारतासाठी कॅप्टन हरमनप्रीत सिंह यानेच दोन्ही गोल केले. टीम इंडियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्येही कांस्य पदक मिळवलं होतं.

  • 08 Aug 2024 06:50 PM (IST)

    तिसऱ्या सत्रानंतर टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर

    टीम इंडियाने तिसरं सत्र आपल्या नावावर केलं आहे. टीम इंडिया स्पेनविरुद्ध 2-1 ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाचा शेवटच्या सत्रात आघाडी मजबूत करुन कांस्य पदक मिळवण्यावर लक्ष असणार आहे.

  • 08 Aug 2024 06:33 PM (IST)

    टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर, कॅप्टन हरमनप्रीतकडून दुसरा गोल

    टीम इंडियाने स्पेन विरुद्ध दुसरा गोल करत आघाडी घेतली आहे. कॅप्टन हरमनप्रीत सिंहने टीम इंडियासाठी दुसरा गोल केला. भारताने तिसऱ्या सत्रात पहिला आणि एकूण दुसरा गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

  • 08 Aug 2024 06:15 PM (IST)

    टीम इंडियाकडून दुसऱ्या सत्राच्या शेवटी स्पेन विरुद्ध 1-1 ने बरोबरी

    हॉकी टीम इंडियाने दुसऱ्या सत्राच्या शेवटी गोल करत स्पेन विरुद्ध 1-1 ने बरोबरी केली आहे. कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने 30 व्या मिनिटाला गोल केला. यासह दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे.

  • 08 Aug 2024 05:58 PM (IST)

    स्पेनने खातं उघडलं

    हॉकी स्पेनने टीम इंडिया विरुद्ध खातं उघडून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. स्पेनने दुसऱ्या सत्रातील 18 व्या मिनिटाला गोल केला आणि आघाडी घेतली आहे. स्पेनसाठी कॅप्टन मार्क मिरालेस याने पेनल्टी स्ट्रोकचं रुपांतर गोलमध्ये केलं.

  • 08 Aug 2024 05:53 PM (IST)

    पहिलं सत्र 0-0 ने बरोबरीत, दोघांनाही गोल करण्यात अपयश

    इंडिया-स्पेन यांच्यातील कांस्य पदकाच्या सामन्यातील पहिलं सत्र 0-0 ने बरोबरीत राहिलं आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी चिवट झुंज एकमेकांना गोल करण्यापासून रोखलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा दुसऱ्या सत्रात आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

    पहिलं सत्र बरोबरीत

  • 08 Aug 2024 05:29 PM (IST)

    हॉकी इंडिया-स्पेनचा सामना, कोण जिंकणार कांस्य पदक?

    हॉकी इंडिया-स्पेनच्या सामन्याला सुरुवात झाली आहे.  दोन्ही संघात कांस्य पदकासाठी हा सामना होत आहे.  टीम इंडियाला उपांत्य फेरीत जर्मनी तर स्पेनला नेदरलँड्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता इंडिया-स्पेन यांच्यात सामना होत आहे. पीआर श्रीजेश याचा हा शेवटचा सामना आहे. तसेच अमित रोहिदास याचं कमबॅक झालं आहे. अमितवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.

  • 08 Aug 2024 04:44 PM (IST)

    आज रात्रीच होणार उपांत्य फेरीतील सामना

    भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अमनने 57 किलो वजनीगटात क्वार्टर फायनल सामन्यात अल्बानियाच्या पैलवानाला धुळ चारली. अमनने 12-0 अशा फरकाने हा सामना जिंकला. आता उपांत्य फेरीतील सामना हा आज रात्रीच होणार आहे.

     

  • 08 Aug 2024 04:16 PM (IST)

    “खेळाडू म्हणून विनेश फोगटसाठी वाईट वाटतंय, विनेशच्या अपात्रतेवरुन स्वप्निल कुसाळेची प्रतिक्रिया

    कोल्हापूरपच्या स्वप्निल कुसाळे याने भारताला  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतील आणि एकूण तिसरं पदक मिळवून दिलं. त्यानंतर स्वप्निल मायदेशात परतल्यानंतर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. स्वप्निलने टीव्ही 9 सह संवाद साधला.  मी कांस्यवर समाधानी नसून देशासाठी सुवर्ण पदक आणण्याचं माझं स्वप्न असल्याचं स्वप्निलने म्हटलं.

    “माझं स्वप्न इथेच संपलं नाही देशासाठी गोल्ड आणणं हे माझं मुख्य स्वप्न आहे. मी त्यासाठी प्रयत्न करत राहणार. आज मायदेशी परतलो आनंद वाटला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे”, असं स्वप्निलने म्हटलं. तसेच महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपात्रेवरुन स्वप्निलने “खेळाडू म्हणून विनेश फोगटसाठी वाईट वाटत आहे”, असं म्हटलं.

  • 08 Aug 2024 04:10 PM (IST)

    पैलवान अमन सेहरावतच्या क्वार्टर फायनल सामन्याला सुरुवात

    पैलवान अमन सेहरावतच्या क्वार्टर फायनल सामन्याला सुरुवात झाली आहे. अमनसमोर अल्बानियाचं आव्हान आहे.
    अमनने प्री क्वार्टर फायनलमध्ये उत्तर मॅसेडोनियाच्या ईगोरोव व्लादिमीर याचा 10-0 फरकाने पराभव केला.

  • 08 Aug 2024 04:08 PM (IST)

    अमन सेहरावतकडून पदकाची आशा, उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

    भारतीय पैलवान अमन सेहरावत याने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. अमनने 57 किलो वजनी गटात झालेल्या प्री क्वार्टर फायनल सामन्यात 10-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला. अमनने उत्तर मॅसेडोनियाच्या ईगोरोव व्लादिमीर याचा पराभव केला.

     

  • 08 Aug 2024 03:59 PM (IST)

    भारताचं 8 ऑगस्टचं वेळापत्रक

    पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत आज 8 ऑगस्ट रोजी भारताच्या खात्यातील पदकांची संख्या वाढण्याची तीव्र शक्यता आहे.  हॉकी इंडिया आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याकडे साऱ्या भारतीयांच्या नजरा लागून आहेत. जाणून घ्या दिवसभराचं वेळापत्रक.

    भारताचं 8 ऑगस्टचं वेळापत्रक