Swapnil Kusale 72 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये देशासह महाराष्ट्राचं नाव उंचवण्यासाठी सज्ज, सामना केव्हा?
Who Is Swapnil Kusale: महाराष्ट्रातील कोल्हापूरातील स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील 50 मीटर 3 पोझिशन प्रकारातील अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्वप्निल आता पदकाचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. जाणून घ्या त्याचा इथवरचा प्रवास.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत केवळ 2 पदकंच आहेत. महिला नेमबाज मनू भाकर हीने भारताला पहिलंवहिलं मेडल मिळवून दिलं. त्यांतर मिश्र दुहेरीत सरबज्योत सिंह याच्यासह मनु भाकरने भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. त्यानंतर काही खेळाडूंचं आव्हान हे पहिल्याच फेरीत संपुष्ठात आलं. तर काही खेळाडू पुढील फेरीसाठी पात्र ठरले. भारताची स्पर्धेतील पाचव्या दिवशी 31 जुलैला आतापर्यंत समाधानकारक कामगिरी राहिली. मात्र आता क्रीडा चाहत्यांना विशेष करुन महाराष्ट्रातील जनतेला 1 ऑगस्टचे वेध लागले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. कोल्हापूरचा पठ्ठ्या नेमबाज स्वप्निल कुसाळे हा गुरुवारी पदकासाठी मैदानात उतरणार आहे.
स्वप्नीलकडे तब्बल 72 वर्षांची महाराष्ट्राची ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकाची प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी 1952 साली वैयक्तिक पदक जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी वैयक्तिक मेडल जिंकण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे स्वप्नीलकडून सर्वांनाच आशा आहेत.
स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 31 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्वप्निलने प्राथमिक फेरीत 590 गुणांसह सातवं स्थान मिळवलं. स्वप्निल यासह या क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत पोहचणारा पहिला भारतीय ठरला आहे. स्वप्निलचा पदकाचा सामना हा गुरुवारी 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे.
स्वप्निलचा अल्परिचय
स्वप्निल कुसाळे हा मुळचा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीतील कांबळवाडीचा रहिवासी आहे. स्वप्निल शेतकरी कुंटुबातला आहे. स्वप्निलची आई अनिता कुसाळे या सरपंच, वडील आणि दोन्ही भाऊ हे शिक्षक आहेत. स्वप्निल राज्य सरकारच्या प्रबोधनी योजनेचा नेमबाज आहे. स्वप्निल 2009 पासून बालेवाडीत सराव करत आहे. स्वप्निल 2013 पासून दीपाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनात शिकत आहे. दीपाली देशपांडे या महाराष्ट्राच्या नेमबाज तसेच माजी ऑलिम्पियन आहेत. स्वप्निलने 12 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर यंदा ऑलिम्पिक पदार्पण केलं आहे.
स्वप्निलला लहानपणापासून खेळाची आवड होती. मात्र त्याला 2 खेळांमधून एकाचीच निवड करावी लागली. स्वप्निलने नेमबाजीवर ‘नेम’ लावला. तिथून स्वप्निलच्या नेमबाज होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. स्वप्निलकडे सुरुवातीला या खेळासाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठी पैसे नव्हते. मात्र स्वप्निलने या साऱ्या परिस्थितीवर मात केली आणि स्वप्निल आता भारताला मेडल मिळवून देण्याच्या उंबरठ्यावर आहे.
कारकीर्दीतील उल्लेखनीय कामगिरी
स्वप्निलने त्याच्या कारकीर्दीत भारतासाठी विविध स्पर्धांमध्ये चमकदार आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वप्निलनने कैरो वर्ल्ड शूटिंग स्पर्धेत वैयक्तिक चौथ्या स्थानासह ऑलिम्पिक कोटा मिळवला. तसेच सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं. स्वप्निलने 2022 साली एशियाडमध्ये सांघिक पातळीवर सुवर्ण पदकाला गवसणी घातली. बाकू वर्ल्ड कपमध्ये मिक्स डबलमध्ये गोल्ड मेडल मिळवत सुवर्ण कामगिरी केली. तसेच दिल्लीत 2021 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सांघिक सुवर्ण मिळवलं.
महेंद्रसिंह धोनी आदर्श
टीम इंडियाचा माजी कर्णधार हा कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात टीसी होता. तीच बाब स्वप्निलबाबतही सारखी आहे. स्वप्निल 2015 पासून मध्य रेल्वेसोबत टीसी म्हणून कार्यरत आहे. धोनी हा स्वप्निलचा आदर्श आहे. धोनीने मैदानात कायम शांतपणे प्रत्येक परिस्थितीचा ‘सामना’ केला. नेमबाजीतही तसाच संयम असावा लागतो. त्यामुळे स्वप्निल स्वत:ला धोनीसोबत जोडू शकतो.
“मी नेमबाजीत खेळाडूंना फॉलो करत नाही. मी महेंद्रसिंह धोनी याचा फॅन आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानात शांत असायचे, तसंच माझ्या खेळातही शांत आणि सहनशील स्वभावाची गरज आहे. आमच्या दोघांमध्ये आमच्या कामाचा हुद्दा (टीसी) सारखा असल्याने मी त्यांना माझ्यासोबत कनेक्ट करु शकतो”, असं स्वप्निलने म्हटलं.