पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील महिला ॲथलिटला जिवंत जाळलं, धक्कादायक घटना समोर
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील महिला ॲथलिटला जिवंत जाळल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. संबंधित महिल ॲथलिटला तिच्याच बॉयफ्रेंडने घरी जात पेटवलं. नेमकं काय कारण होतं ते जाणून घ्या.
आताच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील युगांडाची ॲथलिट रेबेका चेप्टेगीबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेबेका चेप्टेगी केनियात राहायला असून ती गंभीरपणे भाजली गेली आहे. रेबेका चेप्टेगी नुकतीच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. रेबेका चेप्टेगीचे शरीर 75 टक्क्यांहून भाजले गेले आहे. कथितपणे रेबेकाच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या अंगावर पेट्रोल टाकत जाळल्याचा प्रयत्न केला.
दोघांमध्ये एका जमिनीवरून वाद सुरू असल्याचं स्थानिक प्रशासनाने अहवालामध्ये म्हटलं आहे. 33 वर्षीय रेबेका चेप्टेगीवर हिच्यावर वेस्टर्न ट्रान्स-नोझिया काउंटीमधील तिच्या घरी हल्ला झाला. ट्रान्स-नोझिया काउंटीचे पोलिस कमांडर जेरेमिया ओले कोसिओम या घटनेबाबत संपूर्ण माहिती दिली. रेबेकाचा एक्स बॉयफ्रेंड डिक्सन याने पेट्रोल खरेदी केले आणि तिच्या घरी जाऊन अंगावर ओतलं. आगीमध्ये रेबेकासह तिचा बॉयफ्रेंडही भाजला गेला. केनियातील एल्डोरेट शहरातील मोई टीचिंग अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रेबेका चेप्टेगीचा जन्म 22 फेब्रुवारी 1991 रोजी युगांडा येथे झाला. रेबेका 2010 पासून रेसिंग करत आहे. रेबेकाने 2022 मध्ये थायलंडमधील चियांग माई येथे जागतिक माउंटन आणि ट्रेल रनिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. दरम्यान, केनियामधील महिला खेळाडूंवरील हल्ल्यांचे घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. याआधी एप्रिल 2022 मध्ये महिला धावपटू डमारिस मुटुआची उशीने तोंड दाबून हत्या केली गेली होती. तर महिन्यांपूर्वी ॲग्नेस टिरोपची चाकूने हत्या केली होती. गेल्या वर्षी 2023 मध्ये युगांडाचा ऑलिम्पिक धावपटू आणि स्टीपलचेसर बेंजामिन किपलागट यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला होता.