Pro Kabaddi 2024 : लीगमध्ये अजूनही 12 संघांना सुपर सिक्समध्ये पोहोचण्याची संधी, यु मुंबा आणि तेलुगु टायटन्सला करावं लागेल असं
प्रो कबड्डी लीग स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्यांचा निकाल गुणतालिकेत मोठी उलथापालथ करत आहे. त्यामुळे आता टॉपला असलेला संघ आणि तळाशी असलेला संघ कधी वरखाली होईल सांगता येत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात काही संघांनी जबरदस्त कामगिरी केली. पण मध्यांतरात यात उलटफेर पाहायला मिळत आहे.
मुंबई : प्रो कबड्डी लीग 2023-24 स्पर्धेत आता प्रत्येक जय पराजय महत्त्वाचा आहे. कारण यापुढे एखादा पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणणारा आहे. एकूण 12 संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. त्यापैकी टॉप 6 संघांची वर्णी प्लेऑफमध्ये लागणार आहे. त्यामुळे चुरशीच्या टप्प्यावर संघांमध्ये जोरदार लढाई पाहायला मिळत आहे. आता टॉप सिक्समध्ये असलेल्या संघांना आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे. तर तळाशी असलेल्या संघांची टॉप सिक्समध्ये वर्णी लावण्यासाठी धडपड सुरु आहे. काल परवापर्यंत पुणेरी पलटण टॉपला होती. पण जयपूर पिंक पँथर्सने एक विजय मिळवत आघाडीला स्थान मिळवलं आहे. अजूनही 12 संघांना टॉप 6 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. प्रत्येक संघ 22 सामने खेळणार आहे. एका विजयासाठी प्रत्येक संघाला 5 गुण मिळतात. जर सामना बरोबरीत सुटला तर 3 गुण मिळतात. एखाद्या संघाचा पराभव झाला पण 7 पेक्षा कमी फरकाने झाला तर एक गुण पदरात पडतो. तर 7 पेक्षा जास्त फरकाने पराभव झाला तर 0 गुण मिळतात. असं सर्व गणित पाहता आतापर्यंत प्रत्येक संघाचे 8 ते 9 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे नशिबाचं टाळ कधीही उघडू शकतं. अगदी तळाशी असलेल्या तेलुगू टायटन्सलाही सुपर सिक्सची संधी आहे.
तेलुगू टायटन्सची या स्पर्धेत सर्वात सुमार कामगिरी राहिली आहे. 12 पैखी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर 11 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. जयपूर पिंक पँथरसोबत 4 च्या फरकाने, तर गुजरात जायन्ट्ससोबत 6 च्या फरकाने, हरयाणा स्टिलर्स 1 च्या फरकाने, बंगळुरु बुल्ससोबत 2 च्या फरकाने, गुजरात जायन्टस्सोबत 7 च्या फरकाने पराभव झाला. तेलुगू टायटन्सला प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे तेलुगू टायटन्सचे एका सामन्यातील विजयाचे 5 आणि वरील प्रत्येकी एक गुण पकडून दहा गुण झाले आहेत.
तेलुगू टायटन्सने उर्वरित 10 सामन्यात सलग विजय मिळवल्यास 50 गुणांची भर पडेल. त्यामुळे एकूण 60 गुण होतील आणि सुपर सिक्सचा मार्ग मोकळा होईल. कारण सहाव्या स्थानावर राहण्यासाठी 60 गुण पुरेसे आहेत. पण एखाद्या सामन्यात पराभव झाल्यास थेट बाहेरचा रस्ता आहे.
यु मुंबा सुपर सिक्सच्या रेसमध्ये कायम आहे. सध्या सातव्या स्थानावर असली तरी अजून 10 सामने खेळायचे. मुंबई इंडियन्सच्या पदरात 36 गुण असून यात आणखी भर पडली तर निश्चित सुपर सिक्समध्ये स्थान मिळू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात सुपर सिक्सची लढत आणखी रंगतदार होणार यात शंका नाही.