तनुजा माळी कुस्तीत राज्यातून पहिली, गोरखपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड
Tanju Mali : सांगलीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत शिकणाऱ्या तनुजा माली हीने एक नंबर कामगिरी केलीय. तनुजाने 42 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलंय. तनुजा राज्य पातळीवर अशी कामगिरी करणारी जिल्हा परिषद शाळेतील पहिलीच विद्यार्थीनी ठरली आहे.
शाळेपासून ते थेट राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासासह खेळातही चमकदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. अशीच कामगिरी सांगलीतील तासगाव तालुक्यातील सावळज येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 ची विद्यार्थीनी तनुजा अनिल माळी हीने केली आहे. तनुजाने कुस्तीत राज्य पातळीवर पहिला क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे. तनुजा यासह राज्य स्तरावर सुवर्ण पदक मिळवणारी जिल्हा परिषद शाळेची पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे. तनुजाने कुस्तीत 42 किलो वजनी गटात राज्यातून पहिली येण्याचा बहुमान मिळवलाय. तनुजाची यासह उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तनुजाच्या या कामगिरीमुळे कुटुंबासह गावात आनंदाचं वातावरण आहे.
अभ्याससह कुस्तीचा सराव
तनुजा सध्या सातवीत शिकत आहे. तनुजाने वडिलांच्या प्रोत्साहानामुळे कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याचं ठरवलं. तनुजाने खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत कुस्तीचा सरावही सुरु ठेवला. तनुजाने आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही फक्त नि फक्त जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर इथवरचा प्रवास केला आहे. राज्यस्तरीय शालेय कुस्ती 2024-2025 स्पर्धेचं आयोजन हे परभणी येथे करण्यात आलं होतं. तनुजा या स्पर्धेत 14 वर्षांखालील 42 किलो वजनी गटात मॅटवरील कुस्तीच्या फ्रीस्टाइल स्पर्धेमध्ये कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करत होती. तुनजाने या स्पर्धेत नाशिकच्या अक्षदा सनकर हीच्यावर एकतर्फी मात केली. तुनजाने अक्षदाचा 10-0 ने धुव्वा उडवत पहिला क्रमांक पटकावला.
शिक्षकांची साथ आणि मार्गदर्शन
तनुजाच्या या प्रवासात तिला शाळेतील शिक्षक, केंद्र प्रमुख आण्णासाहेब गायकवाड आणि मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील यांचं सहकार्य लाभलं. तनुजा सध्या दिग्विजय कुस्ती केंद्र, बेडग येथे सराव करतेय. तनुजा सध्या पैलवान सचिन शिंदे, नितीन शिंदे आणि अनिल माळी यांच्या मार्गदर्शनात डावपेच शिकतेय. त्यामुळे आता ग्रामस्थांसह राज्याला तनुजाकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा असणार आहे. तसेच तनुजासमोर आता राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटूंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे तनुजा या कुस्तीपटूंचा कसा सामना करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.