भारताच्या वाघिणीचा संपूर्ण प्रवास, वयाच्या 9 व्या वर्षी वडिलांची हत्या ते पॅरिस ऑलिम्पिक फायनल, जाणून घ्या
Vinesh Phogat Full Story in Marathi : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने फायनल गाठली. पण त्यानंतरच्या बारा तासांमध्ये सर्व काही उलटंच झालं. सेमी फायनल पाहून सर्व भारतीय झोपले आणि सकाळी चॅम्पियन विनेश फायनलसाठी अपात्र झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. वजन कमी करण्यासाठी रात्रभर विनेशसह सर्व स्टाफने शर्तीचे प्रयत्न केले. पण यश काही आलं नाही, सर्वांसाठी मोठा धक्काच होता. पण तुम्हाला माहिती आहे का? चॅम्पियन खेळाडू विनेश 9 वर्षांची असताना तिच्या वडिलांची हत्या झाली होती. तेव्हापासून ते आताच्या पॅरिस ऑलिम्पिक फायलनपर्यंतच्या प्रवासात तिच्या जीवनात अनेक वादळे येऊन गेलीत. याबाबत सर्व सविस्तर वाचा.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्व भारतीयांच्या मनाला खोलवर जखम झाली आहे. भारताची वाघिण विनेश फोगाटने 50 किलो वजन गटामध्ये फायनलमध्ये धडक मारली. पण वजन जास्त झाल्याने तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं. भारताचं रौप्य पदक निश्चित झालं होतं. सामना झाला असता आणि विनेश फोगाटने जिंकला असता तर सुवर्ण अक्षरात तिच्या कामगिरीची नोंद झाली असती. पण असं काहीच झालं नाही. कारण विनेश फोगाटचे 100 ग्रॅम वजन वाढल्याने तिला अपात्र करण्यात आलं. पैलवानांच्या घरात जन्मलेल्या भारताच्या वाघिणीसोबतचा प्रवास काही सोप्पा राहिलेला नाही. विनेशचा आत्तापर्यंतचा प्रवास जाणून घ्या.
हरियाणामध्ये विनेश फोगाटचा जन्म
हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील बलाली या गावातील राहणाऱ्या फोगाट घरातील मुलींनी जगभर आपल्या कामगिरीने नाव कमावलं. ‘दंगल’ चित्रपट आला तेव्हा गीता फोगट आणि बबिता फोगाट यांच्याविषयी सर्वांनाच माहिती झाली. अनेकांना अजुनही असेच वाटते की विनेश हीसुद्धा महावीर फोगट यांची मुलगी आहे. फोगट यांच्या कुटुंबामध्ये एकूण सहा भावंडे आहेत. महावीर फोगाट यांना गीता, बबिता, रितू, संगीता आणि भाऊ दुष्यंत अशी चार मुले आहेत. तर महावीर यांचे भाऊ राजपाल फोगाट यांच्या विनेश आणि प्रियांका या दोन मुली आहेत विनेश फोगाटचा जन्म 25 अगस्त 1994 मध्ये झाला होता. विनेश फोगाट लहान असतानाच राजपाल यादव यांच हत्या झाली होती. प्रियंका आणि विनेश यांनाही आपल्या मुलांप्रमाणेच महावीर यांनी सांभाळ करत कुस्तीचे धडे दिले.
जमिनीच्या वादातून वडिलांची हत्या
विनेश अवघ्या नऊ वर्षांची असताना जमिनीच्या वादातून तिच्या वडिलांची हत्या झाली होती. इथून विनेशची आई प्रेमलता यांची काका महावीर फोगट (गीता, बबिता यांचे वडील) यांनी पूर्ण काळजी घेतली. विनेश फोगाट आपल्या बहिणींसोबतच सराव करत दिवसेंदिवस दमदार प्रदर्शन करत होती. ज्युनियर पातळीवर विनेश आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकत राहिली.
विनेशची आंतरराष्ट्रीय करियरला सुरूवात
विनेश ज्युनियर स्तरावर चांगली कामगिरी करत राहिली आणि 2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेतून विनेशने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. विनेशने फ्रीस्टाइल 52 किलोग्रॅम गटात कांस्यपदक जिंकले, तर त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या वजनी गटात फोगट बहिणींपैकी गीता, बबिता आणि विनेश तिघी वेगवेगळ्या वजनी गटात सुवर्णपदक विजेत्या आहेत. विनेश फोगाटची बहिण प्रियंकानेही आशियाई चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. रितू ही राष्ट्रीय चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती आहे.
रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये मोठी दुखापत
विनेशने आपला सराव सुरू ठेवला होता, 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 48 किलो वजनी गटामध्ये खेळत होती. मात्र गुडघ्याला दुखापत झाली आणि तिचा सामन्यात पराभव झाला. तिच्या गुडघ्याचे लिगामेंट फाटल्याने त्यावर सर्जरी करावी लागली. त्यावेळी विनेश नऊ महिने कुस्तीपासून दूर होती. 2017 मध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये तिने जोरदार कमबॅक करत रौप्य पदक जिंकलं. विनेशने कुस्तीच्या मैदानात ‘पुनर्जन्म’ घेतल्यासारखं मानलं जात होतं. त्यानंतर विनेश फोगाटने काही थांबायचं नाव घेतलं नाही. 2018 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण जिंकलं. तर 2018 मध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती.
2018 मध्ये विनेश फोगाट अडकली विवाहबंधनात
2018 मध्ये विनेश फोगाट विवाहबंधनात अडकली. विनेशचा प्रेमविवाह होता, तिचा पती जिंद जिल्ह्यातील सहकारी कुस्तीपटू सोमवीर राठीसोबत तिने 13 डिसेंबर 2018 ला लग्न केलं होतं. दोघेही 2011 पासून एकमेकांना ओळखत होते, भारतीय रेल्वेमध्ये दोघेही एकत्र नोकरी करत होते. दोघांची सुरूवातीला ओळख झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीचं प्रेमात रूपांतर झालं. 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून विनेश दिल्ली विमानतळावर परतली होती. त्यावेळी सोमवीरने तिला लग्नासाठी मागणी घालत विमानतळावरच अंगठी घातली आणि साखरपुडा केला. सोमवीर राठीहासुद्धा राष्ट्रीय स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक विजेता आहे.
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये विनेशचा पराभव
2019 मध्ये विनेश फोगाटने तिचा वजन गट बदलला आणि 53 किलोमध्ये खेळायला लागली. 2020 मधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्व देशवासियांना तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. विनेशचं पदकही निश्चित मानलं जात होतं. स्वीडनच्या सोफिया मॅटसनला हरवून विजयाने सुरुवात केली होती. पण पुढच्या फेरीमध्ये बेलारूसच्या व्हेनेसाने तिचा पराभव करत तिला बाहेर केलं. त्यावेळी सामना झाल्यावर, माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती काही बरोबर नाही, असं विनेश फोगाट म्हणाली होती.
विनेश फोगाट त्यानंतर काही वादांमुळे चर्चेत राहिली होती, ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये इतर भारतीय कुस्तीपटूंसोबत प्रशिक्षण घेण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली होती. विनेशने त्यावेळी पर्सनल कोच वॉलर अकोस यांच्याकडेच प्रशिक्षण घेणार असल्याचं सांगितलं होतं. ऑलिम्पिकमध्ये जे अधिकृत किट दिले गेले होते तेसुद्धा तिने घातलं नाही म्हणून भारतीय कुस्ती महासंघाने तिला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये पुन्हा विनेश फोगट मॅटवर उतरली. वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीप 2022 मध्ये कांस्य आणि बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यावेळी तिच्या कोपऱ्याची सर्जरी झाली होती.
जंतर-मंतर मैदानावर आंदोलनात सहभागी
जानेवारी 2023 मध्ये दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर मोठे नावाजलेले कुस्तीपटू आंदोलनाला बसले होते. यामध्ये महिला आणि पुरूष दोन्ही कुस्तीपटूंचा समावेश होता. या आंदोलनामध्ये काही दिवस हे कुस्तीपटू जमीनीवर झोपले होते. भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामध्ये विनेश फोगाटचाही समावेश होता. सुरूवातीला जानेवारी त्यानंतर एप्रिल महिन्यात कुस्तीपटू आंदोलनासाठी बसले होते. यावेळी अनेक मल्ल सहभागी झाल्याने आंदोलन चांगलंच पेटलं होतं. त्यावेळी विनेश फोगाटसह इतर कुस्तीपटूंना पोलीस आंदोलनस्थळावर धरपकड करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.त्यावेळी आता या मल्लांच करियर संपलं अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र हार मानेल ती विनेश कसली? तिने आपला सराव, मेहनत आणि हिंमत सोडली नाही. फक्त संधीची वाट पाहत होती. विनेशने 2024 आशियाई कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेतला आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोटा गाठला.
विनेश फोगाटची पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील कामगिरी
विनेश ऑलिम्पिकमधील प्रवास एकदम सुसाट राहिला. पहिल्याच सामन्यात चारवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या युई सुसाकीचे आव्हान होते. जपानच्या महिला कुस्तीपटूला विक्रमच हादरवून टाकणारा होता. 82-0 असा रेकॉर्ड असणाऱ्या युई सुसाकीचा विनेशने 3-2 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पाऊणतासानंतरच्या दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा 7-5 ने पराभव करत सेमी फायनल गाठली. सेमी फायनलकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. या सामन्यातही विनेशने 5-0 ने सामना जिंकत क्युबाच्या कुस्तीपटूचा पराभव केला. या विजयासह फायनलमध्ये जाणारी ती पहिला भारतीय कुस्तीपटू ठरली होती. त्यासोबतच या विजयाने भारताचे एक पदक निश्चित झालं होतं.
फायनल सामना (सुवर्ण पदकासाठी) 7 ऑगस्टला होणार होता. या सामन्यासाठी काही तास बाकी होते. पण सलग तीन सामने खेळणाऱ्या विनेशने सेमी फायनलचा सामना झाल्यावर छोटीशी मील खाल्ली त्यामुळे तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही वाढलं. विनेशसाठी हीच मोठी डोकेदुखी ठरली. पॅरिस ऑलिम्पिकवरून आलेल्या अनेक बातम्यांनुसार तिने वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. वजन कमी करण्यासाठी विनेशसह सर्व कोट आणि स्टाफनेही प्रयत्न केले. केस बारिक केले, नखे कापलीत, सायकलिंग केली पण त्याचा काही फायदा झाला नाही. कारण तिचे वजन 50.100 भरले आणि विनेश फोगाटसह करोडो भारतीयांनाच ऑलिम्पिकमध्ये अपात्र केलं गेलं. विनेशने पदक जरी मिळवंल नसलं तरी पोरगी वाघिणीसारखी लढली आणि फायनल गाठली. पदकापेक्षा विनेशने आपल्या खेळाच्या जोरावर प्रत्येक भारतीयाच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली यात काही शंका नाही.