पोलिसांनी रोखलं, Bajrang Punia पंतप्रधान निवासस्थानाबाहेर पद्म पुरस्कार रस्त्यावर ठेऊन परतला
Bajrang Punia | भारताचा दिग्ग्ज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने बृजभूषण सिंह प्रकरणावरुन मोठा निर्णय घेत त्याला देण्यात आलेला पद्म पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हीने गुरुवारी 21 डिसेंबर रोजी निवृत्तीचा निर्णय घेतला.
मुंबई | महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हीच्यानंतर आता बजरंग पूनिया याने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षाची घोषणा झाल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. बजरंगने त्याला मिळालेलं पद्म पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. बजरंगने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. तसेच बजरंगने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. “मी पद्म पुरस्कार पंतप्रधान यांना परत करत आहे. माझ्याकडे बोलण्याबाबत फक्त पत्रच आहे”, असं बजरंगने म्हटंलय. तसेच बजरंग पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहचला. तेव्हा बजरंगला पोलिसांनी रोखल्याने तो पुरस्कार रस्त्यावर ठेवून निघून आला. आता यावरुन सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
घोषणानेनंतर थेट अमंलबजावणी
बजरंगला त्याने कुस्तीत दिलेल्या योगदानासाठी 2019 साली पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. मात्र आता बजरंगवर तोच पुरस्कार परत करण्याची वेळ ओढावली. बजरगंने जसं म्हटलं तसं केलं. बजरंग केलेल्या घोषणेनंतर पद्म पुरस्कार परत करण्यासाठी निघाला. मात्र पंतप्रधानांची वेळ न घेतल्याने पोलिसांनी त्याला अडवलं. बजरंगने भेट होऊ शकत नसेल तर पुरस्कार पंतप्रधानांपर्यंत पोहचवा, अशी विनंती केली. मात्र ही विनंती मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे बजरगंने पद्म पुरस्कार पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेरील पदपथावर ठेवलं. आता सर्व प्रकारानंतर सरकारच्या भूमिककडे साऱ्या भारताचं लक्ष लागून आहे.
बजरंग पूनिया काय म्हणाला?
- भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बृजभूषण सिंह यांची सत्ता.
- महिला कुस्तीपटूंवर लैगिंक शोषणाचा आरोप असलेला व्यक्तीकडे पुन्हा एकदा कुस्ती महासंघाची सूत्रं.
- मला या अन्यायानंतर 2019 मध्ये मिळालेलं पद्मश्री पुरस्कार डिवचत आहे.
- महिला कुस्तीपटूंच्या अपमानानंतर मी सन्मानाने जगू शकत नाही. त्यामुळे मी हा बहुमान परत करत आहे.
नक्की विषय काय?
भारतीय कुस्ती महासंघाचा 21 डिसेंबर रोजी निकाल लागला. या निकालात संजय सिंह यांचा विजय झाला. त्यामुळे आता संजय सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असणार आहेत. आता साक्षी मलिका, बजरंग पुनिया यांचा असा आरोप आहे की संजय सिंह हे बृजभूषण सिंह यांच्या मर्जीतले आहेत. बृजभूषण सिंह हे भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष राहिले.
सिंह अध्यक्ष असताना त्यांनी महिला कुस्तीपटूंवर लैगिंक शोषण केल्याचा आरोप कुस्तीपटूंकडून करण्यात आला. बृजभूषण सिंह यांच्या विरोधात काही महिन्यांआधी या कुस्तीपटूंनी रान पेटवलं. तेव्हा या कुस्तीपटूंना बृजभूषण सिंह कुस्ती महासंघाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, असं आश्वासन देण्यात आलं. मात्र संजय सिंह यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
आता हे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह बृजभूषण सिंह याचे मर्जीतले आणि बिजनेस पार्टनर असल्याचा आरोप कुस्तीपटूंचा आहे. त्यानुसार साक्षी मलिकने गुरुवारी पत्रकार परिषद घेत कुस्तीला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता बजरंगने पद्म पुरस्कार परत करण्याचं हत्यार उपसलं आहे.