WFI अध्यक्षपदी बृजभूषण सिंहच्या जवळची व्यक्ती, कुस्तीपटू साक्षी मलिक हीची निवृत्ती
Sakshi Malik Retirement | माजी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह 'बबलू' यांची भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुंबई | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आलेली आहे. ऑल्मिपिकमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकवणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हीने मोठा निर्णय घेतला आहे. साक्षीने कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूक निकाल जाहीर होताच साक्षीने हा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड होताच साक्षीने हा निर्णय घेतलाय.
संजय सिंह उर्फ बबलू यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर साक्षीने पत्रकार परिषद घेत रडत रडत हा निर्णय घेतलाय. मी कुस्तीचा त्याग करते, असं साक्षीने म्हटलं. बृजभूषण सिंह यांच्यावर काही महिन्यांपूर्वी 7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात देशभर राण पेटलं होतं. तेव्हा साक्षी मलिक आणि इतर कुस्तीपटूंनी बृजभूषण यांचा कडाडून विरोध केला होता.
गुरुवारी 21 डिसेंबर रोजी भारतीय कुस्ती महासंघाला नवे अध्यक्ष मिळाले. वाराणसी कुस्ती संघाचे सर्वेसर्वा असलेले संजय सिंह हे आता अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. संजय सिंह यांनी कॉमनवेल्थन गेम्स 2010 मध्ये सुवर्ण पदक विजेत्या महिला कुस्तीपटू अनिता श्योरण यांचा पराभव केला. संजय सिंह हे खासदार बृजभूषण सिंह यांच्या मर्जीतले आणि निकटवर्तीय आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. त्यानंतर बृजभूषण सिंग यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.
साक्षी मलिकला अश्रू अनावर
#WATCH | Delhi: Wrestler Sakshi Malik breaks down as she says “…If Brij Bhushan Singh’s business partner and a close aide is elected as the president of WFI, I quit wrestling…” pic.twitter.com/26jEqgMYSd
— ANI (@ANI) December 21, 2023
साक्षी मलिकने पत्रकार परिषदेत काय म्हटलं?
“आम्ही लढाई लढली. पूर्ण ताकदीने लढली. मात्र भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर बृजभूषण सिंह याचा माणूस राहणार असल्यास मी कुस्तीचा त्याग करते. अध्यक्षपदी निवड झालेली व्यक्ती ही बृजभूषण सिंह यांचा सहकारी आहे, त्यांचा बिजनेस पार्टनर आहे. मी कधीही रेसलिंग रिंग दिसणार नाही” असं म्हणत साक्षी मलिकने हातात बूट घेत रडू लागली.