तिरंगा फडकला, राष्ट्रगीत सुरु झालं, अभिमानाने ऊर भरुन सिंधूच्या डोळ्यात अश्रू तरळले
भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू (P V Sindhu) हिने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. सलग दोन अंतिम सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर अखेर सिंधूने तिचं ध्येय गाठलं आणि ती जगज्जेती ठरली.
मुंबई : ऑलिम्पिकमधील ‘सिल्व्हर गर्ल’ आता ‘सोनेरी’ झाली आहे. भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू (P V Sindhu) हिने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. सलग दोन अंतिम सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर अखेर सिंधूने तिचं ध्येय गाठलं आणि ती जगज्जेती ठरली. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर सिंधूने तिच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले. त्यासोबतच तिने तिच्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
‘जेव्हा मी राष्ट्रगीतादरम्यान तिरंग्याला वर चढताना पाहिले, तेव्हा मी अश्रू थांबवू शकली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील विजयाबाबतच्या माझ्या भावना शब्दात मांडणं अशक्य आहे. गेल्या अनेक काळापासून मी या दिवसासाठी तयारी करत होती. अखेर प्रतीक्षा संपली. हे यश माझे आई-वडील, माझे प्रशिक्षक (गोपी सर आणि मिस किम) आणि माझे ट्रेनर (श्री श्रीकांत वर्मा) यांच्या समर्थनाशिवाय शक्य नव्हते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझे प्रायोजक आणि सर्व चाहत्यांना धन्यवाद देऊ इच्छिते, ज्यांनी मला समर्थन दिले. अखेर वर्ल्ड चॅम्पियन 2019’, अशी पोस्ट सिंधूने सोशल मीडियावर शेअर केली.
या विजयापूर्वी सिंधूला अनेक मोठ्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. ‘अंतिम, उपात्यंपूर्व सामन्यात पराभूत झाल्यानंतर मला खूप राग यायचा, मी निराश व्हायची. गेल्या दोन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मला पराभव स्विकारावा लागला. पण, हा विजय त्या प्रत्येक व्यक्तीसाठी उत्तर आहे, ज्यांनी नेहमी माझ्या खेळावर प्रश्न उपस्थित केले. मला माझ्या रॅकेटने त्यांना उत्तर द्यायचं होतं, जे मी दिलं. मी स्वत:ला प्रोत्साहित केलं, जिंकण्यासाठी तयार केलं आणि परिणाम सर्वांच्या समोर आहे’, असं सिंधूने सांगितलं. हा सामना जिंकल्यावर दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
सिंधूकडून ओकुहाराचा पराभव
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रविवारी (25 ऑगस्ट) झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूची लढत जपानच्या नोजोमी ओकुहारा (Nozomi Okuhara) हिच्याशी झाली. 24 वर्षीय सिंधूने ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिंधूने सेमीफायनलमध्ये चीनच्या चेन यू फेईला 21-7, 21-14 असे पराभूत केले होते. सिंधूने हा सामना 40 मिनिटातच संपवला होता. सिंधू वर्ल्ड रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी होती, तर यू फेई तिसऱ्या स्थानावर होती. या विजयासह सिंधु सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचली होती. मात्र, दोनदा विश्वविजेता होण्यापासून थोडक्यात चुकलेल्या सिंधूने यावेळी विश्वविजेता पदावर आपले नाव कोरले.
सिंधूकडून 2017 च्या पराभवाचा बदला
याआधी सिंधू 2018 मध्ये स्पेनच्या कॅरोलिना मरीन आणि 2017 मध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराविरोधात अंतिम सामना खेळली होती. मात्र दोन्ही वेळी तिला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नाही. यावेळी तिने आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर 2017 चा बदला घेतला आणि ओकुहाराला पराभवाची धुळ चारली.
संबंधित बातम्या :
पी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय
सिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल
सायना नेहवालचा पराभव, पती पारुपल्ली कश्यपचा संताप
स्मिथबाबत अख्तरचं ट्वीट, युवराजच्या भन्नाट उत्तराने ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ गारद