नवी दिल्ली: भारतासाठी आजचा (25 ऑगस्ट) दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू (P V Sindhu) हिने स्विझर्लंडमधील बासेल येथे झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा (World Badminton Championship) अंतिम सामना जिंकत इतिहास रचला. ही कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.
रविवारी (25 ऑगस्ट) झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूची लढत जपानच्या नोजोमी ओकुहारा (Nozomi Okuhara) हिच्याशी झाली. 24 वर्षीय सिंधूने ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिंधूने सेमीफायनलमध्ये चीनच्या चेन यू फेईला 21-7, 21-14 असे पराभूत केले होते. सिंधूने हा सामना 40 मिनिटातच संपवला होता. सिंधू वर्ल्ड रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी होती, तर यू फेई तिसऱ्या स्थानावर होती. या विजयासह सिंधु सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचली होती. मात्र, दोनदा विश्वविजेता होण्यापासून थोडक्यात चुकलेल्या सिंधूने यावेळी विश्वविजेता पदावर आपले नाव कोरले.
सिंधूकडून 2017 च्या पराभवाचा बदला
याआधी सिंधू 2018 मध्ये स्पेनच्या कॅरोलिना मरीन आणि 2017 मध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराविरोधात अंतिम सामना खेळली होती. मात्र दोन्ही वेळी तिला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नाही. यावेळी तिने आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर 2017 चा बदला घेतला आणि ओकुहाराला पराभवाची धुळ चारली.