भारताविरुद्धच्या पराभवानंतर आत्महत्या करावी वाटली : पाकिस्तानी प्रशिक्षक
विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी धुव्वा उडवला होता. यानंतर मीडिया आणि तज्ञांकडून पाकिस्तानच्या संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
लंडन : पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धचा पराभव एवढा जिव्हारी लागला की मनात आत्महत्येचा विचारही आला होता, अशी कबुली पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी दिली आहे. विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी धुव्वा उडवला होता. यानंतर मीडिया आणि तज्ञांकडून पाकिस्तानच्या संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. कारण, विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या विक्रम यावेळीही भारताने कायम ठेवला.
ऑर्थर यांच्या हवाल्याने वृत्त देण्यात आलंय. गेल्या रविवारी माझ्या मनात आत्महत्येचा विचार होता. पण ही फक्त एका सामन्यातील कामगिरी होती आणि सर्व खुप वेगाने झालं. तुम्ही एक सामना हारता, तर दुसरा जिंकता. मीडियाची टीका, चाहत्यांच्या अपेक्षा आणि त्यात आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्याचं आव्हान आहे. आम्ही सर्व सहन केलं, असं ऑर्थर म्हणाले.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानने कमबॅक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन पाकिस्तानने सेमीफायनलची अपेक्षा जिवंत ठेवली. आम्ही उर्वरित सर्व सामने जिंकण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करु, असंही ऑर्थर म्हणाले. तो फक्त एक सामना होता, आपल्याला बाकीच्या सामन्यांमध्ये चांगलं खेळायचंय हेच मी माझ्या खेळाडूंना सांगतो, असंही ते म्हणाले.
या विश्वचषकात पाकिस्तानच्या नावावर 6 सामन्यात 5 गुण आहेत. 10 संघांच्या गुणतालिकेत पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. पाकिस्तानचा पुढील सामना बुधवारी बलाढ्य न्यूझीलंडशी आहे. त्यानंतर शनिवारी अफगाणिस्तान आणि 5 जुलै रोजी बांगलादेशसोबत लढत होईल.