विराटच्या अनुपस्थितीत रोहितच्या साथीला आता धोनीचं कमबॅक
वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल. भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकत मालिका खिशात घातली खरी, पण चौथ्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघ केवळ 92 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे आता […]
वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल. भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकत मालिका खिशात घातली खरी, पण चौथ्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघ केवळ 92 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे आता विजयी समारोप करण्याचं भारतासमोर आव्हान असेल.
धोनीचं कमबॅक
नियमित कर्णधार विराट कोहलीला आराम दिल्यामुळे कर्णधारपदाची सूत्रे रोहित शर्माकडे आहेत. रोहित शर्माच्या साथीला आता महेंद्रसिंह धोनी आला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याचं पुन्हा एकदा कमबॅक झालंय. त्यामुळे पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात रोहित शर्माला मैदानात साथ देण्यासाठी धोनी उपस्थित असेल. कायम फिट असणाऱ्या धोनीला दुखापतीमुळे दोन सामन्यांना मुकावं लागलं होतं.
भारतीय फलंदाजीची अवस्था किती वाईट होऊ शकते याचा अनुभव चौथ्या वन डे सामन्यात आला. त्यामुळे आता सलामी जोडीवर खरी मदार असेल. कारण, विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर तग धरणारा विश्वासू फलंदाज कुणीही नाही. युवा शुबमन गिलला संधी दिली जाऊ शकते. पण तो नवखा खेळाडू आहे. अशा परिस्थितीमध्ये अंबाती रायुडू, केदार जाधव आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यावर मधल्या फळीची मदार असेल.
गोलंदाजीमध्ये हार्दिक पंड्याचं कमबॅक झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. चौथ्या सामन्यात शानदार क्षेत्ररक्षण करत त्याने कमबॅक केल्याचं दाखवून दिलं होतं. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांचं खेळणं निश्चित मानलं जात आहे. खलील अहमद आणि मोहम्मद सिराज हे दोन पर्यायही रोहित शर्माकडे आहेत.
न्यूझीलंडमध्येही बदलाची शक्यता, मार्टिन गप्टिला दुखापत
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चौथ्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. भारताने केवळ 92 धावसंख्या उभारल्यामुळे फलंदाजांना फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. अनुभवी सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिला दुखापतीमुळे पाचव्या सामन्याला मुकावं लागू शकतं. याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण तरीही केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांसारखे जबरदस्त फॉर्मात असणारे फलंदाज न्यूझीलंडकडे आहेत.
वेलिंग्टनमध्ये भारताचं रेकॉर्ड कसं आहे?
या मैदानात भारताची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. कारण, टीम इंडियाने 16 वर्षांपूर्वी इथे एकमेव विजय मिळवलेला आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात 2003 साली झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर एकही विजय मिळवता आला नाही. या मैदानावर भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. एका सामन्यात पराभव झाला होता, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला होता.
संभावित संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, शुबमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या, खलील अहमद, यजुवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, जेम्स नीशाम, कोलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, टॉम लाथम (विकेटकीपर), कोलिन मुन्रो, हेनरी निकोलस, मिशेल सेंटनर, टीम साउदी